मराठी आरमारचा मानबिंदू ‘किल्ले सुवर्णदुर्ग’, जाणून घ्या इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:11 PM2024-01-02T13:11:27+5:302024-01-02T13:11:53+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव
-महेश कदम, इतिहास अभ्यासक, रत्नागिरी
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या मोजक्या जलदुर्गांची उभारणी केली, त्यात सुवर्णदुर्गचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दक्षिण कोकणात जसा सिंधुदुर्ग, त्यासम मध्य कोकणात सुवर्णदुर्ग आहे. सन १६६० ते १६६५च्या दरम्यान, एका बेटावर शिवरायांनी याची उभारणी केली. यासंबंधी, ‘हर्णे खेड्याजवळ त्याने (शिवाजीराजे) मजबूत किल्ला बांधला.’ असा महत्त्वाचा उल्लेख ७ डिसेंबर १६६४च्या डच रिपोर्टमध्ये आहे. सन १६७१/७२ साली स्वराज्यातील गडांच्या बांधकाम तसेच दुरुस्तीकरिता सुमारे १,७५,००० होन शिवरायांनी मंजूर केले. यातील १०,००० होन सुवर्णदुर्गसाठी खर्च होणार होते.
शिवकाळात सुवर्णदुर्ग किल्ला व हर्णे बंदराचा उपयोग, पाऊस काळात मराठी आरमारातील गलबते नांगरण्यासाठी करण्यात येत असे. पुढील काळात ‘समुद्रातील शिवाजी’ असा लौकिक प्राप्त केलेल्या कान्होजी आंग्रेंचा जन्म व कारकीर्द, सुवर्णदुर्गच्या साक्षीने सुरू झाली आणि हा किल्ला मराठी आरमाराचे बलाढ्य ठाणे म्हणून विख्यात झाला.
शिवरायांच्या जलदुर्ग बांधणी स्थापत्यानुसार साकारलेली सुवर्णदुर्गची खणखणीत तटबंदी, लहान-मोठ्या आकाराचे २४ बुरूज, महादरवाजा, पडकोट, दारूकोठार, चोरदरवाजा, वाड्याचे अवशेष, तोफा आदी गोष्टी पाहता येतात. परंतु सध्या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात बोरीची झाडे वाढल्यामुळे, बहुतांशी अवशेष झाकोळले गेले आहेत अथवा उद्ध्वस्त झाले आहेत.
हनुमान प्रतिमा
दोन बुलंद बुरुजात लपवलेल्या, गोमुखी बांधणीच्या महादरवाजाशेजारी तटबंदीवर हनुमंताचे शिल्प साकारले आहे. शिवरायांनी उभारलेल्या प्रत्येक जलदुर्गावर प्रवेशद्वारात हनुमंताचे दर्शन होते. येथेही असाच वीर मुद्रेतील गदाधारी मारुतीराया कालनेमी राक्षसाच्या मस्तकी पाय ठेवून उभा असलेला दिसतो. आताच्या सुवर्णदुर्गावरील ही एकमेव देवता असावी. कारण, किल्ल्यात याशिवाय दुसरे मंदिर अस्तित्वात नाही अथवा ते काळाच्या ओघात नष्ट झाल्याची शक्यता आहे.
सुवर्णदुर्गच्या ऐतिहासिक घटना
- सरखेल आंग्रे घराण्याचा सुवर्णदुर्ग मुख्य ठाणे होता. सन १७५० नंतर मराठा साम्राज्यात, पेशवे-तुळाजी आंग्रे संघर्ष टोकास पोहोचला. तुळाजीचे मुख्य सागरी शत्रू असणाऱ्या इंग्रजांशी तह करून, नानासाहेब पेशव्यांनी सन १७५५ मध्ये तुळाजीच्या प्रदेशावर आक्रमण केले. इंग्रज सेनानी कमोदर जेम्सने समुद्रातून व पेशव्याचा सरदार रामजी बिवलकर याने जमिनीमार्गे सुवर्णदुर्गवर हल्ला केला. या संदर्भात, ‘जंजिरे सुवर्णदुर्ग येथे सरकारची मोर्चेबंदी झाली होती. गोवा, फत्तेगड, कनकदुर्ग या तिही स्थळास निशाण चढोण, सुवर्णदुर्गात निशाण चढवावयासी नेले होते.’ असे एप्रिल १७५५ मध्ये त्रिंबक विनायक याने पेशव्यास कळविले.
- इंग्रजांच्या जहाजांनी सुवर्णदुर्गास चहूबाजूने वेढा दिला, त्यांच्या जबरदस्त तोफा-बंदुकाच्या माऱ्याने किल्ला हादरून गेला. ११ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजी सैन्याने सुवर्णदुर्गचा भक्कम दरवाजा, कुऱ्हाडीने घाव घालून फोडला आणि पेशव्यांचे निशाण किल्ल्यास लागले. यानंतर मराठी आरमाराचे प्रमुख झालेल्या धुळपांनी सुवर्णदुर्ग लढाऊ बनवला.
- सन १७७४ साली कोकणात इंग्रज-मराठे युद्धाचे ढग जमू लागले. तेव्हा सुवर्णदुर्गचा किल्लेदार लखमोजी खानविलकरने, ‘यैसियासी जंजिरे सुवर्णदुर्गी चौकी, पहारा, अलंग नोबत बहुत सावधतेने करीत आहो. लढाईचे बच्चावाचे तरतूदही आज्ञेप्रमाणे व दर्यात गलबताचे छबिने (गस्त) येस करितो. जंजिराचे पश्चिमेकडील इमारतीचे काम तडक चालिले आहे.’ असे पत्र पेशव्यांना लिहिले.