स्वॅब टेस्टिंग लॅबमध्ये झोलझाल खपवून घेणार नाही : भास्कर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:26+5:302021-05-08T04:33:26+5:30
चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. स्वॅब टेस्टिंगचे ५ हजार नमुने प्रलंबित राहत आहेत. यावर उपाय म्हणून चिपळुणातील ...
चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. स्वॅब टेस्टिंगचे ५ हजार नमुने प्रलंबित राहत आहेत. यावर उपाय म्हणून चिपळुणातील कामथे कोविड सेंटरमध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब मंजूर झाली. या लॅबचे कामही सुरू झाले आहे. लॅबमध्ये २४ तासांत दोन हजार स्वॅब तपासणीची क्षमता आहे. मात्र, सध्या तासाला ३२ आणि २४ तासांत केवळ साडेतीनशेच नमुने तपासले जातात. सध्याचा काळ कोरोनाचा आहे. यात झोलझाल चालणार नसल्याचा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला दिला; तर आरोग्य अधिकाऱ्यांनाही लॅबकडे लक्ष देण्याची सूचना केली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात चिपळूण, खेड व गुहागर विधानसभा मतदार संघांतील कोरोना परिस्थितीचा आढावा भास्कर जाधव यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूण, खेड, गुहागर तालुक्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्याधिकारी, गटविकास अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कामथे उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर झाले असून, ते अधिक सक्षम केले जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात एकच स्वॅब टेस्टिंगची लॅब होती. एकच लॅब असल्याने नमुने तपासणीला विलंब व्हायचा. त्यामुळे चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड तालुक्यांसाठी कामथे येथे लॅब मंजूर होऊन तिचे काम सुरू झाले आहे.
आढावा बैठकीत माहिती देताना संबंधित अधिकाऱ्याने तासांत ३२ नमुने तपासले जात असल्याचे सांगितले. दिवसात दोन हजार नमुने तपासणीची क्षमता असताना केवळ ३५० नमुने तपासले जात असल्याने आमदारांनी आश्चर्य व्यक्त केले. यात काही झोलझाल करू नये, काय ते नियमाप्रमाणे करण्याची सूचना संबंधित प्रतिनिधीला केली.
कामथे येथे ऑक्सिजन प्लांट उभारला जात आहे. या प्रकल्पात दररोज १०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता आहे. चार दिवसांत या प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. खेडचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. शेळके प्राथमिक आरोग्य केंद्राकडे फिरकत नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य चव्हाण यांनी केला. यावरून आमदार भास्कर जाधव यांनी शेळके यांची उलटतपासणी घेतली. डॉ. शेळके केंद्रात जातात की नाही, याची पाहणी करण्याची सूचना खेड प्रांताधिकारी यांना केली. सध्याचा काळ अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा आहे. मात्र, अधिकाऱ्यांनीही बेफीकीर राहू नये, अशा सूचना दिल्या. माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रांत प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती यादव, जिल्हा परिषद सदस्य राजू आंब्रे उपस्थित होते.