स्वाभिमान हा केवळ तिघांचा पक्ष : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:27 PM2019-01-12T23:27:47+5:302019-01-12T23:28:21+5:30
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
गणपतीपुळे : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
खासदार नारायण राणे यांची काही दिवसांपूर्वी नजीकच्या खंडाळा येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती, त्याच गावात शिवसेनेचा शनिवारी सायंकाळी मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांनी पैसे घेऊन ‘स्वाभिमान’मध्ये प्रवेश केला असेल, त्यांनी आपले हात पाय, बोटे, मान सांभाळावेत.
कुटुंब पहिले की पैसा याचा विचार करावा. नारायण राणे यांनी एकदा शिवसेनेकडून पराभवाची धूळ चाखलीच आहे, परंतु त्यांची अजूनही हिम्मत असेल, तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.कोणत्याही फुट्या-दीडफुट्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केलेली नाही, तर ही लोकांशी हितगुज करण्यासाठी आयोजित केलेली सभा आहे, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्गात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला, तो कुणी घेतला? याचा हिशेब चुकता करण्याची आणि जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही राऊत यांनी सांगितले. ज्यांची मतदारांनीच सिंधुदुर्गातून हकालपट्टी केली, तो त्याच्या कर्मानेच मरणार, आता राणे यांची सत्ता संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत राणे यांची उरलीसुरली सत्ताही संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.
या मेळाव्याला आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रकाश साळवी, विलास चाळके, उद्योजक भैया सामंत, माजी सभापती प्रकाश रसाळ, बाबू म्हाप, गजानन पाटील, आदी उपस्थित होते.
हे काय मला पराभूत करणार?
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी रत्नागिरीत आले होते. तरीही भाजप उमेदवार माझा पराभव करू शकला नाही, तेथे ‘हे’ माझे काय करणार? अशा शब्दांत आमदार आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर हल्ला केला.