युतीला स्वबळाची खुमखुमी

By admin | Published: November 3, 2016 12:30 AM2016-11-03T00:30:35+5:302016-11-03T00:30:35+5:30

काँग्रेसची नाईलाज आघाडी : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे लक्ष्य ठेवून मुख्य पक्ष रणांगणात

Swamishri Kumbhumi | युतीला स्वबळाची खुमखुमी

युतीला स्वबळाची खुमखुमी

Next

 रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष नगर परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यासाठीच शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वबळ आजमावत आहेत आणि आतापर्यंत अनेकदा ठेचकाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र आघाडी करण्याचे शहाणपण दाखवले आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये दरी पडली. ती नंतर वाढतच गेली आहे. आताच्या घडीला राज्यस्तरावर युतीचा निर्णय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र युती करण्याबाबतची चर्चाही दोन्ही पक्षांनी केलेली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सर्वात ताकदवान आहे. संख्याबळाचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तिसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. आजवर शिवसेना-भाजपने सर्वच निवडणुका युती म्हणून लढवल्या आहेत. त्यामुळे १९९५पासून बहुतांश ठिकाणी युतीचेच प्राबल्य राहिले आहे. युतीला मिळालेले हे यश ‘युती’ म्हणूनच मिळाले आहे. ज्यावेळी युतीमध्ये फारकत झाली तेव्हा दोन्ही पक्षांना थोड्याफार प्रमाणात फटका बसला आहे. त्यातही भाजपला अधिक फटका बसला आहे. गुहागर विधानसभा मतदार संघात भाजपची हक्काची जागा राष्ट्रवादीकडे गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. रत्नागिरीत भाजपची जागा शिवसेनेला गेली ती फिस्कटलेल्या युतीमुळेच. युती नसल्याने भाजपला हे दोन माठे फटके बसले आहेत. मात्र तरीही भाजपचा स्वबळ आजमावण्याचा अट्टाहास कायम आहे. आताच्या निवडणुकांमध्ये राज्यात युती करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी घेतला असला तरी युती करण्याबाबत जिल्हास्तरावर आवश्यक तो निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात युती करण्याबाबत कोणतीही चर्चाच झाली नाही.
भाजप सोबत असताना शिवसेनेची ताकदही मोठी होती. आजच्या घडीला शिवसेनेचा वरचष्मा असला तरी भाजप साथीला नसल्याने ताकद कमी झाली आहे. पण शिवसेनेनेही युती करण्यामध्ये स्वारस्य दाखवलेले नाही.
नगर परिषद निवडणुका संपल्यानंतर तीन महिन्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील. या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नगर परिषद निवडणुकांकडे पाहिले जात आहे. आपली ताकद किती आहे, याचा अंदाज दोन्ही पक्ष घेत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे.
युतीच्या उलट स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची झाली आहे. १९९९ला राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसना मोठा फटका बसला. त्या फटक्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुका या दोन्ही पक्षांनी आघाडीने लढवल्या आहेत. या दोन्ही पक्षांना स्वबळ आजमावण्याचे दुष्परिणाम भोगावे लागल्यानंतर दोन्ही बाजूंनी शहाणपणाने विचार सुरू असून, या निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. चिपळूण नगर परिषद वगळता जिल्ह्यातील उर्वरित चारही ठिकाणी दोन्ही काँग्रेस आघाडीनेच निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे आघाडीला कळलेले गणित युती मात्र अजून उमगलेले नाही, असेच चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)
युती नेमकी नकोय कोणाला?
जिल्ह्यात आजवर शिवसेना-भाजपला जे मोठे यश मिळाले, ते युतीमुळे मिळाले. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांना काही ना काही परिणाम भोगावे लागले आहेत. मात्र तरीही युती करण्याबाबत चर्चाही झालेली नाही. त्यामुळे युती नेमकी नकोय कोणाला, ही चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून युती तुटण्यासाठी एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Web Title: Swamishri Kumbhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.