कौतुकाच्या थापेवर स्वराज्य
By admin | Published: May 10, 2016 10:22 PM2016-05-10T22:22:31+5:302016-05-11T00:09:53+5:30
नितीन बानुगडे पाटील : रत्नागिरी पर्यटन महोत्सवात व्याख्यानाचा कार्यक्रम
चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य नावाची पहिली सहकारी संस्था निर्माण झाली त्याच्या संस्थापक जिजाऊ होत्या. स्वराज्य हे बक्षिसावर नाही, तर कौतुकाच्या थापेवर उभे होते. महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत उत्तम व्यवस्थापन करुन मोहिमा आखल्या म्हणूनच उण्या-पुऱ्या ५० वर्षांच्या आयुष्यात ते जगप्रसिध्द झाले, असे मत शिवचरित्रकार प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.
चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६मध्ये सांगता समारंभापूर्वी नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवचरित्रावर बोलताना प्रा. बानुगडे पाटील यांनी शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग हुबेहूब समोर उभे केले. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते राज्याभिषेकापर्यंत सर्व प्रवास त्यांनी उलगडला. जनावरांपासून पिकांचे रक्षण व्हावे व स्वराज्यासाठी मावळ्यांची मांदियाळी तयार व्हावी, यासाठी जनावर मारून आणणाऱ्यास जिजाऊंनी इनाम जाहीर केले. यातून दुहेरी फायदा झाला आणि स्वराज्याला नेक मावळे मिळाले. औरंगजेबासारख्या मातब्बर शत्रूकडे ३५० कोटी महसूल होता, तर शिवरायांकडे उणा-पुरा १ कोटी महसूल होता. औरंगजेबाकडे मणभर होते, तर शिवरायांकडे कणभर होते. तरीही कणभर स्वराज्य औरंगजेबाला का हवे होते, हा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. मातीतल्या माणसांनी स्वराज्य उभे केले होते, त्यामुळे हे स्वराज्य आमचे आहे, माझे आहे, याची जाणीव मावळ्यांना होती. या आपलेपणावरच महाराजांनी सर्व लढाया लढल्या. अमेरिकेसारखा बलाढ्य शत्रू व्हिएतनामसारख्या छोटाशा देशाला नमवू शकला नाही. कारण व्हिएतनामच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पुतळा प्रेरणा देतो. पाकिस्तानमध्येही आदर्श राजा कसा असावा, याचे पाठ्यपुस्तकात धडे आहेत. अमेरिकेत शिवाजी दि मॅनेजमेंट गुरु असा धडा अभ्यासाला आहे. आमच्याकडे शिवाजी किती, तर चार मार्काला आहे. एसीत बसून बिसलरीतील पाणी पिऊन दुष्काळ संपवता येणार नाही. सन १९७२मध्ये दुष्काळ पडला तेव्हा रायगडातील गंगा तलावातील पाणी खाली आणण्यात आले होते, हा द्रष्टेपणा शिवरायांकडे होता. सर्व धरणे आटली, तरी रायगडमधील गंगाटोक आटले नव्हते. आज मोबाईलचा जमाना आहे. शिवरायांच्या काळात चांगली किंवा वाईट बातमी देताना वेगवेगळ्या रंगाचा धूर काढून इशारा दिला जायचा. तासाभरात सर्व गडावर चांगली किंवा वाईट बातमी कळत असे, हे व्यवस्थापन राजांचे होते.
महाराष्ट्राला जमिनीवरून नाही तर समुद्रमार्गे धोका आहे, हे ३५० वर्षांपूर्वी राजांनी सांगितले होते. त्यांनी आपले आरमार सुसज्ज केले होते. ५० वर्षात राजांनी ११० किल्ले बांधले. स्वराज्याच्या बळकटीकरणासाठी ते आवश्यक होते. सर्वसामान्य माणसाच्या हाताला कामही मिळणे गरजेचे होते. त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही राजांनी पाळली होती. आज जबाबदारी कोण पाळत नाही. जो तो जबाबदारीपासून दूर होत असतो. आपण साधी मतदानाची जबाबदारी पार पाडू शकत नाही. शर्टाचे पहिले बटण चुकीचे लागले की, खालची सगळी बटणे चुकतात. पहिली चूक झाली की, पुढे सर्व चुका होतात. जी माणसं कारणे सांगतात, यश त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
...तरी रक्त सांडणाऱ्यांना समाधान वाटेल
शिवचरित्रात सकारात्मक दृष्टीकोन होता. त्यामुळे एक एक सरदार जीवाची पर्वा न करता मूठभर मावळ्यांशी लढत होता. महाराजांनी एकावेळी एकच माणूस वापरला. त्या माणसाची पारख आणि त्याचे कर्तृत्व महाराज जाणत होते. स्वराज्याचा कारभार करताना महाराजांनी आपली एक चाल परत वापरली नाही व एका माणसाला पुन्हा संधी दिली नाही. स्वाभिमान जिवंत असेल तर निष्ठा कायम असेल, असे सांगून रत्नागिरी जिल्ह्यात २२ गडकोट आहेत. येथे गेलात तरी या किल्ल्यासाठी रक्त सांडणाऱ्या आपल्या पूर्वजांना समाधान वाटेल. त्यांच्यासाठी तरी गडावर जा, असे आवाहन बानुगडे पाटील यांनी केले.
राजकारण बुद्धीच्या बळावर
राजकारण हे दंडाच्या बळावर होत नाही तर ते बुध्दीच्या बळावर करावे लागते. तुम्ही काम कसे करता हे महत्त्वाचे नाही तर तुमच्या कामाचे नियोजन कसे आहे, यावर त्याचे यश अवलंबून असते. महाराजांनी सर्वच योजनांचे नियोजन केले होते. केवळ त्यांच्या मृत्यूचे नियोजन केले नव्हते. आपलं साम्राज्य वाढवता येत नसेल, तर समोरच्याचं कमी करायला शिका.