स्वयंदेव, नांदिवसेवासीयांचे उपोषण दुसऱ्या दिवशी स्थगित
By संदीप बांद्रे | Published: October 3, 2023 05:07 PM2023-10-03T17:07:44+5:302023-10-03T17:08:15+5:30
चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट, स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती येथील प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी ...
चिपळूण : श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट, स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या संदर्भातील आवश्यक ती माहिती येथील प्रांताधिकाऱ्यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे सहायक धर्मादाय आयुक्तांकडे मागितली आहे. तसे पत्र उपोषणकर्त्या नांदिवसे ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी सोमवारपासून सुरू केलेले उपोषण मंगळवारी दुपारी तात्पुरते स्थगित केले. दरम्यान, मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीला देवस्थान कमिटी गैरहजर राहिली.
ट्रस्टच्या विरोधात नांदिवसे, स्वयंदेव, राधानगरी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनासह सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारपासून चिपळूण प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी देवस्थान ट्रस्ट आणि उपोषणकर्ते यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीला देवस्थान ट्रस्टपैकी कुणीही हजर राहिला नाही. परिणामी उपोषणकर्त्यांनी आपली बाजू मांडत जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा दिला.
यावेळी प्रांताधिकारी यांनी देवस्थान ट्रस्टसंदर्भात प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने आवश्यक ती माहिती सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मागवून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. याबाबतचे पत्र उपाेषणकर्त्यांना दिल्यानंतर हे उपाेषण तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, बाबू साळवी, नितीन ठसाळे, जयंद्रथ खताते उपस्थित होते