यंत्रणा उभी राहतेय, मनुष्यबळ कुठे आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:35+5:302021-04-26T04:28:35+5:30
काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे ...
काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे असे सापडणारे रुग्ण आता पाचशेच्या पुढेच आढळत आहेत. ज्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, त्याचपद्धतीने काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पाच - दहाजणांचा मृत्यू हाेणाऱ्या जिल्ह्यात आता एका दिवसात २६ मृत्यू हाेऊ लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. काेराेनाचा संसर्ग इतक्या वेगाने वाढत आहे, की रुग्णालयातील जागाही आता अपुरी पडू लागली आहे. दरराेज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे काेठे, असा प्रश्न आराेग्य यंत्रणेसमाेर पडला आहे. त्यातच एखाद्या रुग्णाची काेणा ना काेणा राजकीय पक्षाशी ओळख निघाली, तर वैद्यकीय यंत्रणेलाच धारेवर धरले जाते. त्यामुळे आराेग्य यंत्रणेलाही ताणाखाली काम करावे लागते. आज जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे? का? अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या आधारे रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन पडली आहे. आज एक - एक वैद्यकीय अधिकारी १२ ते १४ तासापेक्षा जास्त ड्युटी करत आहे. त्यांच्यावर पडणारा ताण प्रचंड असूनही, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यांच्यातील काेणी काेराेनाबाधित झाले, तर पुन्हा असणारी संख्या कमी हाेणारच आहे.
जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, याला जबाबदार राजकीय नेतेमंडळीच आहेत. आज इतकी वर्षे काेकणचे नेतृत्व करणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला काेकणात सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारता आले नाही, ही शाेकांतिका आहे. आज जिल्ह्याला गरज असताना वैद्यकीय डाॅक्टरांसाठी इतरांकडे हात पसरण्याची वेळ आली? आहे. आजवर केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानणाऱ्या राजकीय मंडळींनी विकासाच्यादृष्टीने काय प्रयत्न केले? पक्ष काेणताही असाे, पण साकव, रस्ते, मंदिर, पूल या कामाव्यतिरिक्त विकासाची काेणती कामे करण्यात आली? इतक्या वर्षात काेकणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहू शकले नाही, यासारखे दुर्दैव ते काय म्हणावे? ‘हे मी केलं’ असे ठासून सांगणाऱ्या राजकीय मंडळींनी आजवर वैद्यकीय महाविद्यालय का उभारले नाही, याचे उत्तर देणे गरजेचे आहे. हे महाविद्यालय सुरू झाले असते तर तिथे शिक्षण घेणारे काेकणातील विद्यार्थी आज मिळाले असते. पण तशी काेणाची इच्छाशक्तीच नाही. सारी यंत्रणा उभारण्यात येईल, पण ती यंत्रणा हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर काय उपयाेग? आज काेराेनासारख्या महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध हाेत नाहीत, म्हणून खासगी डाॅक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. आज काेराेना आहे, उद्या आणखी काही उद्भवेल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काेकणातील आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
- अरुण आडिवरेकर