यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:33 AM2021-05-11T04:33:04+5:302021-05-11T04:33:04+5:30
दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र ...
दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली हाेती.
प्रणालीने अवघ्या २१ वर्षात समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तिला दोन बहिणीही आहेत. प्रणालीने दापोलीमधील कुडावळे येथे दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी यांच्याकडे काही दिवस वास्तव्य करून निसर्गस्नेही जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करता कसं छान जगता येतं, हे प्रणाली येथे शिकली. भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून, संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली जगणारे कुटुंब विक्रांत आणि मोहिनी पाटील यांनीही तिचा पाहुणचार केला.
प्रणाली काही दिवस चिखलगाव येथील दांडेकर परिवाराकडे पाहुणचार घेत लोकसाधना प्रकल्पाचा अभ्यास करणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगीण ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे. त्यामुळे येथे खूप काही नवीन शिकायला मिळेल असा विश्वास प्रणालीने बोलून दाखविला.
सायकलने प्रवास करीत प्रणाली नागरिकांशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करते व माहिती पोचवते. त्या-त्या भागातील माहिती घेते, चर्चा करते. आरोग्य जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते. स्थानिक पर्यावरणाबाबत महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करते. जल, जंगल, जमीन या विषयावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून त्यांची भूमिका जाणून घेते. सध्या कोरोना लॉकडाऊन लागल्यामुळे यामध्ये काही प्रमाणात निर्बंध आले आहेत. प्रवास थांबत थांबत सुरू आहे. या वेळेचा सदुपयोग तिने वाचन, लेखन, अभ्यास यासाठी केला आहे. कोकणातील आंबे, काजू, करवंद, जांभूळ, कलिंगड, फणस, कोकम, जाम आदी फळांचा पण मनमुराद स्वाद घेत आहे.
------------------------------
स्वजबाबदारीवर प्रवास
प्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत स्वजबाबदारीचा आहे. ती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पैसे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आर्थिक व वस्तूरूपातील मदतसुध्दा लोकच करतात. या सात महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत, असे प्रणालीने सांगितले.