दहावी, बारावी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:15+5:302021-04-08T04:31:15+5:30
वाटुळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि राज्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी ...
वाटुळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि राज्यात सर्वत्र रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी व १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने महाराष्ट्र शासनाने राज्यात रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानेही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा जीवापेक्षा महत्त्वाच्या नाहीत. यामुळे विद्यापीठानेही परीक्षांबाबत अद्याप कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही, असे घागस यांनी निवेदनात म्हटले आहे.
सलग १ महिन्याच्या कालावधीत होणाऱ्या या परीक्षांदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयाचा फेरविचार करावा व राज्यातील लाखो विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा द्यावा. याकरिता मोबाईल हँडसेटवर उपलब्ध होईल व विद्यार्थ्यांना घरबसल्या मर्यादित वेळेत उत्तरपत्रिका सोडविता येईल, अशा परीक्षेचे आयोजन करावे, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.