अंत्यसंस्कार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा : अभिजित गुरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:57+5:302021-06-06T04:23:57+5:30
राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार ...
राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाने दाखविलेला बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. याप्रकरणी ज्यांनी हा कोरोनाबाधित मृतदेह राजापुरात आणण्याचा अट्टाहास केला ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी व नगर परिषद प्रशासन यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बाेलताना अभिजित गुरव म्हणाले की, मृतदेहावर कोरोनाच्या नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील असे तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यापुढे सांगणाऱ्या नगराध्यक्षांनी अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून अंत्यविधी केले जात असल्याची माहिती असूनही ते गप्प का राहिले, असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. यामुळे जर का शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहावर त्या त्या ठिकाणी अंत्यसंस्कार व दफनविधी केले जात असताना या व्यक्तीचा मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबाव कुणी टाकला, हा अट्टाहास कशासाठी करण्यात आला, ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी कोण, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. तसेच दफनविधीसाठी मृतदेह राजापूरला आणण्यासाठी राजापूर नगर परिषदेने जो ना हरकत दाखला दिला तो कसा काय आणि कोणाच्या दबावाखाली दिला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
मात्र या प्रकरणात नगर परिषदेनेच व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर व वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, या प्रकाराला नगर परिषद प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. लांजा नगरपंचायत, राजापूर नगर परिषदेचा आणि मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबावाचे राजकारण करणारे लोकप्रतिनिधी तेवढेच जबाबदार असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.