निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

By संदीप बांद्रे | Published: February 17, 2024 03:42 PM2024-02-17T15:42:10+5:302024-02-17T15:42:52+5:30

चिपळूण :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव व भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी ...

Take action against Nilesh Rane, Bhaskar Jadhav, Bombay High Court Adv. Owais Pechkar Complaint of to the police | निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

चिपळूण :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव व भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी बेकायदेशीरपणे जमाव जमवला. या जमावाने महामार्गाची कोंडी केली, शिवाय एकमेकांवर दगडफेक करत गाड्यांचीही तोडफोड केली. शांतता भंग केल्याप्रकरणी या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी शनिवारी येथील पोलिस स्थानकांत केली आहे.
 
अ‍ॅड.पेचकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, चिपळूण शहर हे राजकीय, सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या कोकणातील महत्वाचे शहर आहे. या शहराला राजकीय व सांस्कृतिक वारसा आहे. त्याला तडा देण्याचे काम या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. अतिशय खालच्या दर्जाची गलिच्छ भाषा एकमेकांविरोधात वापरुन चिपळूण शहाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला आहे. त्यांच्या समवेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना चिथावणी देवून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.

शिवाय अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत महामार्गावर असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या. या राड्यातून सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले. तसेच जनतेला त्रास होईल असे कृत्य करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला. वाहतुकीस अडथळा निर्माण करून इतरांच्या जिवीतास धोका निर्माण केला. 

दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सर्वसामान्य जनतेला त्रास होणारी कृत्ये केली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 141, 142, 143, 146, 147, 149, 152, 153, 157, 160, 323, 325, 336, 427, 431, 504, 505 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची सखोल चौकशी करुन दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.  चिपळूण शहराच्या वतीने तक्रार दाखल करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

Web Title: Take action against Nilesh Rane, Bhaskar Jadhav, Bombay High Court Adv. Owais Pechkar Complaint of to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.