मागासवर्गीय निधीचा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा : सुशांत सकपाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:42+5:302021-08-12T04:35:42+5:30
खेड : तालुक्यातील भडगाव भरणे बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी आणि ...
खेड : तालुक्यातील भडगाव भरणे बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरप्रकार करणाऱ्या अधिकारी आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांच्यावर कारवाई करा, यासाठी गेली पाच महिने पाठपुरवा करत असताना यावर प्रशासन मात्र टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रिपब्लिकन पक्ष तीव्र आंदोलन छेडले, असा इशारा कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी दिला आहे.
खेड येथे पत्रकारांशी ते बाेलत हाेते. त्यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्षातर्फे खेड तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्यावेळी प्रांताधिकारी अविषकुमार सोनाने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्या समितीच्या अहवालाप्रमाणे जे दोषी आढळतील व ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे, अशा दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या निर्णयाचा आदर ठेवून आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, या निर्णयाप्रमाणे लवकरात लवकर कारवाई झाली नाहीतर यापुढे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.