रत्नागिरी बसस्थानकाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, मंत्री उदय सामंतांचे निर्देश
By अरुण आडिवरेकर | Published: November 4, 2022 11:27 AM2022-11-04T11:27:18+5:302022-11-04T11:27:42+5:30
मंत्री सामंत यांनी रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली
रत्नागिरी : बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (४ नोव्हेंबर) दिले. मंत्री सामंत यांनी रत्नागिरीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी रहाटघर बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकांची पाहणी केली. रहाटघर बसस्थानकाची रंगरंगोटी आणि परिसर सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देशही दिले. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय अभियंता मोहिते, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक ए. बी. पाटील उपस्थित होते.
दरम्यान, लोकमान्य टिळक स्मारक, तारांगण, लोकमान्य टिळक वाचनालय, रत्नागिरी नगरपरिषद, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.