पावले टाक हिमतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:08+5:302021-05-03T04:25:08+5:30

आला सास, गेला सास, जिवा तुझं रे तंतर। अरे जगणं मरण, एका सासाचं अंतर ।। कवयित्री बहिणाबाईंच्या या ओळींप्रमाणे ...

Take bold steps | पावले टाक हिमतीची

पावले टाक हिमतीची

Next

आला सास, गेला सास,

जिवा तुझं रे तंतर।

अरे जगणं मरण,

एका सासाचं अंतर ।।

कवयित्री बहिणाबाईंच्या या ओळींप्रमाणे सर्वत्र स्थिती असताना भाबड्या श्रद्धेपायी गावागावात पारंपरिक प्रथांवर भर देताना दिसून येत आहे. त्यात कोकणात गाऱ्हाणे, नवस यांचा सर्रास वापर होत आहे. बाया वाढवणे हा तळकोकणात पाहायला मिळणारा आणखी एक प्रकार.

अशी अनंत गाऱ्हाणी,

दाद घ्यावी कुणापाशी

एकादशीच्या पूजेला,

खुद्द विठ्ठल उपाशी

अशी परिस्थिती निर्माण झाली की आलेल्या आपत्तींना परतवून लावण्याकरिता आमच्या लहानपणी मांडात हमखास बाया वाढवल्या जात. तसं आमचं हर्चे दुर्गम, डोंगराळ. अजून सर्व रस्त्यांनी डांबर पाहिलेलं नाही. तरीपण गावाला शिक्षणाची झालर. शिष्यवृत्ती, दहावी, बारावी परीक्षात हर्चे गावाचे नाव कायम अग्रभागी. आमच्या लहानपणी कोणाकडे ना टीव्ही ना इतर मनोरंजनाची साधने. दर मंगळवारी रात्री मात्र जेवण झाले की वाडीतील लहानथोर थेट बायांचा मांड गाठत. सुरुवातीला ढोलकी, टाळ यांची जुगलबंदी. त्यातच लुक्या आबा मोठ्याने म्हणायचे, अरे हातभर गजरा फुलांचा हार. आम्ही पोरे जोरात ओरडायचो, माेठ्या बायांचा जयजयकार.. तीन वेळा हा नाद घुमे. मग गाणी सुरू. संभू अण्णा, अप्पा, शाहीरबाबा, गोविंदबाबा, गुरव आजोबा, तानू अण्णा एकापेक्षा एक गाणी गात.

बायांची प्रमुख यनीकाकू. कडक बाया. सगळ्या बायांची जबाबदारी तिची. मांड भरायचा तिचाच अधिकार. प्रश्न विचारले की तीच उत्तर देणार. जोडीला आमच्या बुवाची बायको सुनीता माई. तिच्या पण बाया भारी. आजही त्यांच्या घरी बायांचे स्थान आहे. यांच्या सर्वांसोबत आरतीचा मान असलेली इंदू बाया. यांच्यात कान्हाचा मान आमच्या परब्या आबाचा. ढोलकी वाजवता वाजवता आबा अंग धरे आणि वाढायला लागे. मग भजनकरी ताल धरीत, सातजणी बाया, आठवा कान्हा, कान्हा खेळतो... असा गोकुळामध्ये कृष्णा वाढतो. भजनकरी जोशात गात. कधी कधी बायांचे देवपण अजमावयाला बाहेर निखारे घालीत. ते तुडवून अंग धरणारे आत येत. जोरात भजन होई. मध्यावर प्रश्न उत्तरे चालत.

मग आमचो बैल कसो आजारी पडलो....?

आमच्या पोरग्याची नोकरी कशान सुटली?

ही तापसरी आमच्या वाडीत कशी आली?

बैलास्न पायलाग झालोय तो भायरच्या भायर कसो जायल?

अगदी काळजीने विचारले जायचे. मुंबईत चाकरमानी जरी आजारी पडले तरी बाया अंगारा देत. मग मधीच यनी काकू, बुवाची बायको यांची जुगलबंदी चाले. अगदीच रंगत आली आणि बायांच्या रंगाचा बेरंग झाला तर लुक्याबुवा समजावणीचा सूर लावीत गाणे गात ...

बाया रुसल्या, बाया रुसल्या, बहू मनाने समजावी ल्या हो, बाया रुसल्या.

सारे शांत होई. जयजयकार पुन्हा घुमे.

हातभर गजरा, फुलाचा हार...

शेवटी चहापाणी होई. कार्यक्रम संपे. पूर्वजांनी मानसिक आधाराकरिता आणि मनोरंजनासाठी जोपासलेले हे भजन कुठलीही आपत्ती आली की गावकरी, मुलाबाळांचे धैर्य वाढवी. बाया आमच्या मदतीला हायत, हो आसऱ्या बाया, लोक निर्धास्त राहत. म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत आमचे बरेच जण जुन्या आठवणी काढून म्हणताहेत, बाया रुसल्यात, मांडात भजन करूया, पण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायची नाही, सामाजिक सुरक्षा पाळायची, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर याबाबतीत जागरूकता असलेली आणि वास्तवाचे भान असलेली आमची सारी मंडळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल्याप्रमाणे,

धर ध्वजा करी ऐक्याची

मनीषा जी महाराष्ट्राची

पावले टाक हिमतीची

कणखर जणू पोलादाची

घे आण स्वातंत्र्याची

महाराष्ट्रास्तव लढण्याची।।

यानुसार कोरोनाविरुद्ध लढण्याची हिम्मत बाळगून आहेत, हेही दिवस जातील यावर साऱ्यांचाच विश्वास आहे.

- सुहास वाडेकर

हर्चे, लांजा.

Web Title: Take bold steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.