बाप्पा सांभाळून जा रे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:50+5:302021-09-19T04:31:50+5:30
चुकून तुलाही ‘हाय’ म्हणणार होतो. व्हाॅटस्ॲपची सवय ना. आताशा साष्टांग नमस्कार वगैरे आम्ही विसरलोच आहोत. काय, निघालास ना? सावकाश ...
चुकून तुलाही ‘हाय’ म्हणणार होतो. व्हाॅटस्ॲपची सवय ना. आताशा साष्टांग नमस्कार वगैरे आम्ही विसरलोच आहोत.
काय, निघालास ना?
सावकाश जा रे.
खड्डे फार पडलेत.
अरे हो... फक्त शिवसेनेच्या शहरातल्या रस्त्यावरच नाही. भाजपच्या महामार्गावरपण. म्हणून म्हणतो सांभाळून जा.
आम्ही घेतोच आहोत आमची हाडं रोज तपासून. तुला तो त्रास नको. उंदीरमामांना सांग खड्डे बघूनच पळा काय ते. आता थोडेच दिवस. आम्ही एवढे दिवस कळ देत देत कळ काढलीच आहे; पण तो त्रास तुझ्या वाट्याला नको. सांभाळून जा.
तू नको पक्षबिक्ष बघू. ते आम्ही बघतो. आम्ही त्यातच रमतो जास्त. उठसूठ मोबाइल हातात घेऊन भक्त-गुलाम खेळण्यापलीकडे आम्हाला काम तरी काय आहे?
अरे बाप्पा, एक सांगायचं राहिलं. कैलासावर पोहोचेपर्यंत मास्क काढू नकोस. हां, थोडं घुसमटल्यासारखं होईल; पण आमच्याकडे गणेशोत्सवात पाहुणे आल्यानंतर जसा कोरोनो वाढतो, तसा तू कैलासावर कोरोना नेऊ नकोस. उगाच तुझ्यावर बालंट यायचं. आम्हाला काय आता सवयच झाली आहे कोरोनाची. आम्ही जगतोय त्यातूनच मार्ग काढत. तुला अनेकांनी साकडं घातलं असेलच. कोरोना जाऊ दे रे बाबा असं. ऐक जमलं तर त्यांचं. खूप हाल झालेत. कोरोनाने नोकरी पळविली, धंदा बुडविला. जगायचं कसं? खायचं काय? असे अनेक प्रश्न आहेत त्यांचे. तरीही तुझ्या स्वागतात, त्यांनी काही कमी केलं नसावं. तू वर्षातून एकदा येतोस. वर्षभराचं सुख देऊन जातोस; पण गेली दोन वर्षे हैराण आहोत रे. तू कर काय तरी, म्हणून म्हणतो, कैलासावर गेलास की यावर विचार कर जरा.
काही जण मनातल्या मनात असेही म्हणाले असतील ना तुझ्यासमोर... राहू दे अजून काही दिवस कोरोना. येऊ दे लाट तिसरी. त्याशिवाय का भरणारे त्यांची तिजोरी. ते घालतील कदाचित तुला सोन्याचे दागिने; पण तू दुर्लक्ष कर. कारण ते फाडतील सॅनिटायझर फवारणीची खोटी बिलं... कोरोना सेंटरच्या नावावर घालतील आकड्यांचा गोंधळ... ते आणतील नवनवी महागडी औषधी.. घाबरवून सोडतील लोकांना. खरं काय, खोटं काय आम्हा बापड्यांना काही कळत नाही. त्याचाच (गैर)फायदा घेतील. म्हणून ऐकू नको त्याचं.
बरं बाप्पा.. जाताना दुकानांची नावे बघू नकोस. तुझ्या नावाची बीअरशॉपी नाही तर परमिट बार दिसला तर रागावू नकोस. आम्ही आता कसलीच बंधनं नाही पाळत. आम्ही मुक्त जगायला शिकतोय ना. म्हणून असेल एखादी गणेश बीअर शॉपी. तू रागावू नकोस. तू सावकाश जा.
तू उंदीरमामाला आणतोस सोबत म्हणून बरं आहे. एसटी, रेल्वे भरभरून जातात तुझ्याच भाविकांनी. मोठालं पोट सांभाळत घुसखोरी करायला तुला जमणारे का? आणि या गर्दीत कोरोनापण असतो म्हणे. तू नकोच जाऊस. त्यात कन्फर्म तिकिटाशिवाय आता रेल्वेच्या फलाटावरपण सोडत नाहीत. त्यापेक्षा तुझा उंदीरमामा बरा. अरे हो, पण त्याला सांग, गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही महामार्गाची कामे अजून सुरूच आहेत. अरे हो रे.. डेडलाइन होती आधीची; पण आता नाही जमलं त्या ठेकेदारांना वेळेत काम करायला. त्यांचं छान चाललंय. राजकारण्यांचं छान चाललंय. आम्हाला आता खड्ड्यांची सवयच झाली आहे म्हणून आमचंही छानच चाललंय. अर्धवट रुंदीकरण, जागोजागी खड्डे, अचानक येणारी डायव्हर्शन याच्याशी आमचं जमलंय आता; पण तू मात्र सांभाळून जा.
वाटेत कुठे सेल्फी काढायला थांबू नकोस. नाही तर कैलासावर गेल्यावर तुला हसतील सगळे. माणसांचं खूळ तुलाही लागलं म्हणून. आणि स्टेटस बदलायच्या भानगडीत पडू नको प्रवासात. निघालास की थेट कैलासावरच जा. नाही तर वाटेत तुझ्याकडेही दोन डोस झाल्याचं सर्टिफिकेट मागेल कोणीतरी. ते नसलं तर तुझीपण अँटिजन करायला मागेपुढे पाहणार नाहीत.
कैलासावर गेलास की पोहोचल्याचा मेसेज नाही केलास तरी चालेल; पण त्या कोरोनाचा विचार नक्की कर. आमचे शेतकरी माल पिकवून तयार आहेत; पण बाजार मिळत नाही. दुकानं उघडी होतायत, पण खरेदीला लोकांच्या हातात फार पैसाच नाही. घरातला कर्ता माणूस, हाताशी येत असलेली तरुण पिढी असं गमावलेली अनेक कुटुंबं आहेत. नोकऱ्या तर अनेकांच्या गेल्या आहेत. त्या सगळ्यांना दिलासा मिळेल, असं काहीतरी कर. आता सगळी मदार तुझ्यावरच आहे. पुढच्या वर्षी लवकर ये, असं आम्ही म्हटलं तू जाताना; पण पुढच्या वर्षी तू येशील, तेव्हा तुझ्या स्वागताला असलेल्या लोकांच्या संख्येत घट व्हायला नकोय. तू विघ्नहर्ता आहेस. तूच बघ आता काय ते.
तुझा लाडका,
कोकणी भाविक
ता. क. आणि हो.. अरे ते रिफायनरी नावाचं एक घोंगडं सगळ्यांनी मिळून भिजत घातलंय.. ते वाळत घालता आलं तर बघ. आम्ही सामान्य माणसं उगाच डोळ्यात आशा जमवून बसलोय.
मनोज मुळ्ये, रत्नागिरी