कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:25 AM2018-04-24T00:25:37+5:302018-04-24T00:25:37+5:30

Taking the law into the hands of the government, | कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

Next


राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
कोकण हा निसर्गरम्य आहे; मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षङयंत्र रचण्यात आले असून, शिवसेना त्याला विरोध करील अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गुजरात काय किंवा नागपूर काय, त्यांना हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा; पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. आमच्या निसर्गाला धोका करणारे प्रकल्प आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरी बांधव, बागायतदार, मच्छिमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले.
नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नव्हती. मग आता ही मंडळी कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
यावेळीे उद्योगमंत्री सुभाष देसाई, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, सेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार वैभव नाईक, आमदार सदानंद चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार तृप्ती सावंत, आमदार राजन साळवी, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सचिन कदम, गौरीशंकर खोत, माजी मंत्री रवींद्र्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यासहित सेनेचे पदाधिकारी तसेच रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सभेकडे अनेक प्रकल्पग्रस्तांची पाठ
नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द न करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे अशोक वालम यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त या सभेकडे फिरकलेही नाहीत. मात्र, भाई सामंत यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त सभेला उपस्थित होते. या सभेला नाणारबाहेरील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाही
जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र, केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीशी सामंजस्य करार केला. त्यावरून मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची काढलेली अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करताच प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे जाहीर आभार व्यक्त केले.

Web Title: Taking the law into the hands of the government,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.