तळीरामांचा घसा कोरडाच - परवानगी नाकारल्याने दुकाने बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 04:03 PM2020-05-04T16:03:14+5:302020-05-04T16:24:28+5:30
रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये ...
रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये वाईन शॉप सुरू होणार असल्याची बातमी रविवारीच सर्वत्र पोहोचली होती. त्यामुळे सकाळपासून रत्नागिरीतील वाईन शॉपसमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तळीराम उभे होते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने दुकाने सुरू करण्याबाबत कोणतीच परवानगी न दिल्याने अखेर तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.
शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांद्वारे ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यात सर्व दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ही दुकाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून वाईन शॉपही सुरू होणार असा मेसेज सर्वत्र फिरत होता. रविवारी सायंकाळी हा मेसेज सर्वत्र फिरल्यानंतर सोमवारी तळीरामांच्या प्रतीक्षेचा बांध फुटला आणि गेले दीड महिना प्रतीक्षेत असलेल्या तळीरामांनी रत्नागिरीतील दुकानांसमोर सकाळी ८ वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या.
दुपारपर्यंत वाईन शॉप सुरू न झाल्याने तळीरामांची चुळबुळ सुरू झाली. यासंदर्भात कोणती माहिती आली आहे का, याची चाचपणी सुरू झाली. काही दुकान मालकांनी राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात जाऊन विचारणाही केली. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याबाबत कोणतेच आदेश दिले नसल्याचे पुढे आले. त्यामुळे रत्नागिरीतील दुकाने बंदच ठेवण्यात आली होती.
अखेर सकाळपासून रांगेत उभे राहून मद्याची प्रतीक्षा करणाऱ्या तळीरामांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक्षेत असणाऱ्या तळीरामांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.