कुणबी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करणार
By admin | Published: September 12, 2014 11:36 PM2014-09-12T23:36:11+5:302014-09-12T23:36:41+5:30
शिष्टमंडळाची भेट : आता कोणता निर्णय होणार याकडे लक्ष
चिपळूण : तिल्लोरी कुणबी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले.
या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण समितीने मोर्चा काढला होता. सर्व समाजबांधव एकत्र आल्याने या मोर्चालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याची दखल मंत्रालय स्तरावरही घेण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी ज्येष्ठ नेते दादा बैकर, गोपिनाथ झेपले, राजाभाऊ कातकर, दौलत पोस्टुरे, शंकर कवणकर, अॅड. सुजित झिमण, सुनील पवार, चंद्रकांत परवडी, वसंत उदेग, रमेश राणे, गणपत गावकर, तुषार परवडी आदी उपस्थित होते. समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आरक्षणासाठी आयोग नेमण्याची तयारी दर्शविली. परंतु, त्याला शिष्टमंडळाने विरोध केला. कारण आजपर्यंत ५ समित्या नेमण्यात आल्या. त्याचे काय झाले? ते कोणालाच समजले नाही. स्वातंत्र्यानंतरही या समाजाचा प्रश्न सुटलेला नाही, ही बाबही निदर्शनास आणून दिली. आरक्षणाचा प्रश्न लवकरच सोडवावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीबाबत काय होणार इकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)