पाठिंब्यासाठी नारायण राणे यांच्याशी चर्चा, सुनील तटकरे यांची रत्नागिरीत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 08:44 PM2018-05-03T20:44:30+5:302018-05-03T20:44:30+5:30
राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेचा पाठिंबा आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्याशी माझे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठिंबा देण्याबाबत बोलणे झाले आहे.
रत्नागिरी : राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेचा पाठिंबा आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांच्याशी माझे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठिंबा देण्याबाबत बोलणे झाले आहे. कणकवलीत आम्ही एकत्र निवडणूक लढलो आहोत. राणे हे मोठे नेते आहेत. ते त्यांची भूमिका जाहीर करतील, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेसबरोबर जागावाटपाबाबत गुरुवारी सायंकाळी चर्चा होणार असल्याचे तटकरे म्हणाले.
यापुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपशी युती करणार नाही. सर्व निवडणुका स्वबळावर लढवू, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेसाठी पुन्हा युती केली आहे. शिवसेना नेत्यांची ही धरसोड वृत्ती नेहमीचीच आहे. यांच्यावर विश्वास कोण ठेवणार, असा टोला त्यांनी लगावला. रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या मतदारसंघात तीनही जिल्ह्यात मिळून ९४१ मतदार आहेत. त्यातील ४६३ हा जादुई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पार करून विजयी होणारच असा दावा तटकरे यांनी केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री असूनही अनंत गीते यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात कोकणकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोकणात रासायनिक प्रकल्प नको ही भूमिका आम्ही आधीच घेतली होती. अवजड उद्योग खाते मिळाल्यानंतर जिल्ह्यात चांगले प्रकल्प येतील, ही अपेक्षा होती. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प गीतेंकडून जिल्ह्यात येऊ शकला नाही, अशी टीका तटकरे यांनी केली.