रत्नागिरीभर राड्याचीच चर्चा...
By admin | Published: December 24, 2014 11:14 PM2014-12-24T23:14:31+5:302014-12-25T00:06:40+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : शासकीय कार्यालयासमोर असा प्रकार शांततेला बाधाच
रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी दोन गटात राडा झाला. प्राणघातक हल्ला झाला. हत्याराचा स्वैर वापर झाला. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जो काही प्रकार घडला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असा प्रकार प्रथमच घडला आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, यासाठी कठोर कारवाई होण्याची मागणी आता जनतेतूनच होत आहे.
पूर्ववैमनस्यातून साळवी स्टॉप येथील एका हॉटेलमध्ये २१ डिसेंबर २०१४ रोजी राडा झाला होता. बाटल्या फोडणे, मारहाण करणे असे प्रकार झाले होते. परंतु त्यानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. तरीही नंतर हल्लागुल्ला करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. जामीन प्रक्रिया झाल्यानंतर पाचही आरोपींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या पूर्ततेसाठी तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी यांच्याकडे बोलावण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही गटात हा प्रकार पोलीस आणि तहसीलदार यांच्या समोर घडला आहे.
मुळातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हे तहसील कायालय आहे. याठिकाणी प्रांत कार्यालयही आहे. येथे दररोज विविध कामांसाठी तालुक्यातील लोकांची सतत ये-जा सुरू असते. दुपारच्या वेळी तर याठिकाणी अधिकच गर्दी असते. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तहसीलदारांकडून बोलावण्यात आल्यानंतर संबंधित आरोपी व त्यांच्याविरोधातील जो काही गट होता, यांनी आपण न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आहोत, याचे भान ठेवून वागणे आवश्यक होते. जे काही वैमनस्य होते त्यावरून राडा करण्याचे तहसील कार्यालय परिसर हे ठिकाण नव्हते. त्यामुळे ज्या कार्यालयांमध्ये न्यायाची वा न्यायासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी प्रक्रिया होते, अशा ठिकाणी गुन्ह्यात संशयित असलेल्या, कारवाईत नावे असलेल्या व्यक्तींनी कायद्याची आब राखूनच वर्तणूक ठेवायला हवी, हे सांगण्याची गरज नाही. किंबहुना अशा लोकांनीच नव्हे; तर शासकीय कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांनीही हे संकेत पाळणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)
ही घटना पहिली अन् शेवटची ठरावी...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहेच परंतु जिल्हा प्रशासन कार्यालयाच्या आवाराचे कायदेशीर पावित्र्य कलंकित करणारी आहे. त्यामुळे घडलेली ही घटना त्या ठिकाणची पहिली व शेवटची असायला हवी. त्यामुळेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिसांनीही अत्यंत कडक अशी भूमिका घेत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.