पर्यटन व शाश्वत कृषी विकासाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास साधणार : योगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:14+5:302021-07-12T04:20:14+5:30
मंडणगड : स्वातंत्र्योत्तर कालखंडात रोजगार निर्मितीच्या आघाडीवर मागासलेला म्हणून गणला गेलेल्या मंडणगड तालुक्यात पर्यटन व कृषी विकासावर भर देऊन ...
मंडणगड : स्वातंत्र्योत्तर कालखंडात रोजगार निर्मितीच्या आघाडीवर मागासलेला म्हणून गणला गेलेल्या मंडणगड तालुक्यात पर्यटन व कृषी विकासावर भर देऊन रोजगार निर्मितीला अग्रक्रम देणार असल्याचे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी मंडणगड येथे केले.
याेगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले की, मंडणगड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेणार असून, तालुक्यातील किल्ले मंडणगड व किल्ले हिंमतगड या दोन किल्ल्यांचा संशोधनात्मक अभ्यास करुन येथे पर्यटन विकासाच्या सर्व संधी विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही किल्ल्यांचा विकास आरखडा तयार करुन दोन्ही किल्ल्यांचे इतिहास संशोधनाचे कार्य पूर्ण करुन येथे पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. आगामी काळात हे दोन्ही किल्ले आपल्या गतवैभवापर्यंत इतिहास सांगताना येथे येणाऱ्या पर्यटकांना कालसंगत सोयी-सुविधाही देतील. तालुक्यातील वेळास, आंबडवे, उन्हवरे व सर्व पुरातन मंदिरेही विकसित करण्यात येणार आहेत. येथील ग्रामीण लोकजीवन व निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या जीवनशैलीचे बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसमोर सादरीकरणाचे नियोजन असून, या प्रयत्नांना यश आल्यास तालुक्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर पर्यटनातील सेवा उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध असेल. येथील नैसर्गिक साधनसंपत्ती व मुबलक पाण्याचा वापर करुन शेती व दुबार शेतीचे आधारे कृषी पर्यटनाचे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, कृषी पर्यटन, पावसाळी पर्यटन व जल पर्यटन या विषयांनाही यथाशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
खासगी क्षेत्रातील जंगलातील पर्यावरण व वन्यजीवन यांचे पर्यटनाचे दृष्टीने सादरीकरण करत रोजगार निर्मिती करणार असून, मुंबई व पुणे या महानगरांपासून असलेल्या चार तासांचे अंतर ही मंडणगडची जमेची बाजू आहे. तिचा पुरेपूर लाभ घेता पर्यटन व कृषी या दोन्ही क्षेत्रांतील सर्व संधी विकसित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. येथील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला स्थानिक पातळीवर उत्तम भाव मिळावा, यासाठी मंडणगडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सुरु करण्याचे नियोजन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेला मंडणगड तालुका जलमार्गाचे काळात संपन्न होता. ती संपन्नता बदलत्या काळात गतवैभवाचे रुपाने परत मिळवून देणे, हे माझे काम आहे. त्यासाठी निश्चितपणे शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे व त्यासाठी लघु दीर्घकालीन नियोजन केले असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.