तळवडे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:27+5:302021-06-29T04:21:27+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तळवडे ग्रामपंचायतीला गेले तीन-चार महिने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय ...
पाचल : राजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तळवडे ग्रामपंचायतीला गेले तीन-चार महिने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. या ग्रामपंचायतीला तातडीने ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी तळवडे ग्रामस्थांनी केली आहे.
याअगोदर असलेले ग्रामविकास अधिकारी सुधाकर पेडणेकर हे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या अनेक चांगल्या योजना त्यांनी यशस्वीपणे राबविल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांमधून आजही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जागी कांबळे नावाचे ग्रामविकास अधिकारी तातपुरत्या स्वरूपात देण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्याकडे ताम्हाणेसारखी मोठी ग्रामपंचायत व अन्य ग्रामपंचायतींचा चार्ज असल्याने ते पुरेसा वेळ या ग्रामपंचायतीला देऊ शकत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, घरकुल योजना अशा अनेक योजना ठप्प झाल्या आहेत. तसेच कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव गावात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ही अतिशय गंभीर अशी बाब आहे. या कठीण परिस्थितीत ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नितांत गरज असताना शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीला शासनाने लवकरात लवकर कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.