तब्बल ३४ दिवसांनी तळवडे - पाचल नदीवरील पूल वाहतुकीला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:39+5:302021-08-27T04:33:39+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल-जवळेथर मार्गावरील तळवडे-पाचल गावाला जोडणाऱ्या अर्जुना नदीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस खुला केला आहे; ...
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल-जवळेथर मार्गावरील तळवडे-पाचल गावाला जोडणाऱ्या अर्जुना नदीचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस खुला केला आहे; मात्र सद्यस्थितीत छोट्या वाहनांनाच वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने तब्बल ३४ दिवसांचा कालावधी घेतला हाेता.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला होता. त्यामुळे पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता. सुमारे ४० गावांचा संपर्क पाचल बाजारपेठेशी तुटला गेल्याने गेले महिनाभर जनतेची प्रचंड गैरसोय झाली होती. दरम्यानच्या काळात खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी या पुलाची पाहणी करून पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या; मात्र बांधकाम विभागाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे पूल दुरुस्तीसाठी तब्बल एक महिना लागला. त्यामुळे जनतेमध्येही संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत चांगलेच धारेवर धरले होते. पूल तातडीने वाहतुकीसाठी खुला न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा सौंदळकर यांनी बांधकाम विभागाला दिला होता. अखेर तब्बल ३४ दिवसांनी हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रिक्षा, दुचाकी अशा छोट्या वाहनांना पुलावरून वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. अवजड व मोठ्या वाहनांच्या वाहतुकीबाबत बांधकाम विभाग लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.