तळवडे-ताम्हाणे घाटी रस्ता बनलाय मद्यप्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:51+5:302021-04-05T04:27:51+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलनजीक असलेल्या तळवडे-ताम्हणे घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, हा रस्ता मद्यप्यांचा ...
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलनजीक असलेल्या तळवडे-ताम्हणे घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, हा रस्ता मद्यप्यांचा अड्डाच बनला आहे. त्यामुळे परिसरातील जनतेमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या मद्यप्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तळवडे-ताम्हाणे गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
तळवडे-ताम्हाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थ व महिलांची संख्याही मोठी आहे. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर या रस्त्यावर मद्यप्यांचा मोठा सुळसुळाट असतो. कायदा व नियम धाब्यावर बसवून ही मंडळी सार्वजनिक ठिकाणी मद्य पिऊन हैदोस घालत असतात. रस्त्यांच्या बाजूला तळवडेतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यांच्या भातशेतातही दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसताे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना त्रास होताे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे किंवा मद्यप्राशन करणे हा कायद्याने गुन्हा असूनही हे मद्यपी कायदा व निकम धाब्यावर बसवत आहेत. याठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.