तांडा वस्ती सुधार योजनेचा खेडमध्ये बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:04+5:302021-08-13T04:36:04+5:30
दस्तुरी : शासनाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत प्रथमच धनगर समाजाचा समावेश केला आहे. २०१८ च्या सुधारित शासन ...
दस्तुरी : शासनाने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार याेजनेत प्रथमच धनगर समाजाचा समावेश केला आहे. २०१८ च्या सुधारित शासन निर्णयानंतर खेड तालुक्यात मात्र या याेजनेचा पुरता बाेजवारा उडाला आहे. या याेजनेअंतर्गत तालुक्यात धनगर समाजातील एकाही व्यक्तीला लाभ देण्यात आलेला नाही. तालुक्यातील हा कारभार न सुधारल्यास धनगर समाज बांधवांना साेबत घेऊन जन आंदाेलन उभारू, असा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.
तांडा वस्तीच्या सुधारित शासन निर्णयात लोकसंख्येच्या प्रमाणात विकास कामांना अनुदान मंजूर करण्याची अट घालण्यात आली आहे. दोन वर्षात शासनाच्या बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत एकही काम मंजूर होऊ न शकल्याने धनगर समाजामध्ये प्रचंड नाराजी प्रकट होत आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या कामात शासकीय दिरंगाई मोठ्या प्रमाणात होत आहे.
अनेक ग्रामसेवक तांडा वस्तीचे प्रस्ताव वेळेवर देत नाहीत व दिले तरी अपूर्ण असतात. या सर्व प्रकारामुळे खेड तालुक्यात तांडा वस्ती सुधार योजनेचा बोजवारा उडाला आहे. वरील सर्व गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच खेड तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना सोबत घेऊन जनआंदोलन करू, असे रामचंद्र आखाडे यांनी सांगितले.