कुंभार्ली घाटात ३०० फूट दरीत कोसळला टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:48+5:302021-07-19T04:20:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटून टॅंकर थेट ३०० फूट खाेल ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटून टॅंकर थेट ३०० फूट खाेल दरीत काेसळल्याची घटना शनिवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या दरम्यान गुहागर-विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात घडली. चार तासाच्या अथक परिश्रमानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. राजेंद्र तावसा बनसोडे (५५, रा. सांगली) असे चालकाचे नाव आहे.
राजेंद्र बनसाेडे हा मळी घेऊन कऱ्हाडहून चिपळूणच्या दिशेने शनिवारी रात्री येत हाेता. कुंभार्ली घाटातील लीला हॉटेलच्या वरच्या बाजूला वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. गर्द झाडी असतानाही हा टँकर सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस, स्थानिक तलाठी एडगे, पंचायत समितीचे सदस्य बाबू साळवी, अनंत साळवी व अन्य ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यापाठोपाठ तहसीलदार जयराज सूर्यवंशी, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, तलाठी राजेशिर्के, मंडल अधिकारी गिज्जेवार पोहाेचले. यावेळी चिपळूण नगर परिषदेकडील दोरखंड, जम्बो लॅम्प व अन्य साहित्य नेण्यात आले होते. त्याच्या मदतीने ग्रामस्थ रात्रीच दरीत उतरले आणि चालकाला रात्री ३.३० वाजता सुखरूपपणे बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या बनसोडे यांना हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तत्काळ कराड येथील रुग्णालयात नेण्यात आले.
--------------------------------------
शोध कार्यात दोन वेळा अपयश
एकीकडे जोरदार पाऊस आणि गर्द झाडीमुळे शोध कार्यात अडचणी येत होत्या. दोनवेळा काही ग्रामस्थ अपघातग्रस्त गाडीपर्यंत पोहचले. परंतु, त्यांना तेथे कोणीही आढळले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा मागे फिरल्यानंतर त्यांना बनसोडे यांचा ओरडल्याचा आवाज आला. अखेर आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तेथे बनसोडे जखमी अवस्थेत आढळले.
180721\img-20210718-wa0002.jpg
कुंभार्ली घाटात 300 फूट दरीत कोसळला टँकर