दाभोळ घाटात टँकर उलटला, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक वळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:47 PM2024-06-21T16:47:10+5:302024-06-21T16:47:53+5:30
टँकरमधील गॅस लिक झाला नसल्याचे मोठी दुर्घटना टळली
देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळ घाटात मंगळवारी (१८ जून) टॅंकर उलटून अपघात झाला हाेता. या टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले हाेते. त्यासाठी पाली ते दाभोळे मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बावनदी-साखरपा देवरुख मार्गे वळवण्यात आली आहे. रात्री उशिरा हा मार्ग माेकळा हाेण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दाभोळे घाटात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने गॅसवाहक टँकर (टीऐन ८८, सी ५८७३) घेऊन चालक सागर खिळे (२८ रा. कानडी, ता. आष्टी, जि. बीड) जात हाेता. दाभोळे (ता. संगमेश्वर) गावच्या हद्दीतील घाटात आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या उजव्या बाजूला ५० ते ६० फूट खोल दरीत काेसळला. त्यामध्ये चालक सागर खिळे किरकोळ जखमी झाल्याने उपचाराकरिता पाठवण्यात आले हाेते. अपघातानंतर जेएसडब्ल्यू कंपनीचे गॅस एक्सपर्ट नीलेश भोसले यांनी टँकरमधील गॅस लिक झालेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम गुरुवारी हाती घेण्यात आले हाेते. हे काम सुरू असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. मात्र, यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील पाली ते दाभोळे या भागावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तसेच साखरपाकडून येणारी वाहने साखरपा देवरुख मार्गे रत्नागिरीकडे वळवण्यात आली. तर कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहने पालीपासून थांबवण्यात आल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी साखरपा मुर्शी तपासणी नाक्याचे पोलिस उपनिरीक्षक कदम व पोलिस कर्मचारी तसेच हातखंबा महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पाेलिस निरीक्षक विक्रमसिंह पाटील व पोलिस उपस्थित हाेते.