जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करजुवेत टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 02:46 PM2019-05-22T14:46:02+5:302019-05-22T14:51:15+5:30
संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.
देवरूख : संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.
मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावामध्येही सध्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी समस्या भेडसावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. या गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, वाकसालवाडी, चांदिवडेवाडी, मावळातली बाचीमवाडी, भोईवाडी, तिसंगवाडी, डावलवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड या ११ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्याकडे सादर केला होता.
काही दिवसांपूर्वीच या गावाच्या दौºयावर आलेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या गावात दोन टँकर पोहोचले. या टँकरने चाफेवाडी, मोरेवाडी, चांदिवडेवाडी, बाचिमवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.
यावेळी संगमेश्वरचे पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, करजुवेचे सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावासाठी दोन टँकर मिळाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवरूख तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले.