रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:34 PM2019-06-19T16:34:31+5:302019-06-19T16:35:22+5:30

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

Tanker's 700 rounds in 15 days in Ratnagiri | रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्यामुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार

रत्नागिरी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

शहरातील नळपाणी योजना जुनाट झाल्याने ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या गेली पाच वर्षे निर्माण होत आहे. या समस्येमुळे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या ६३ कोटी खर्चाच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याला लागलेले ग्रहण सुटणार आहे.

यंदा रत्नागिरी शहरातील खासगी विहिरीही एप्रिलअखेर व मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्या. रडतखडत सुरू असलेल्या रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मे महिन्यात टॅँकरचेच पाणी

शहरवासियांना मे महिन्यात दररोज टॅँकरच्या ५५ फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मे महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागात नागरिकांना तब्बल साडेसोळाशे फेऱ्यांमार्फत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यावेळी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.

मुख्य जलवाहिनीचे काम सुरु

रत्नागिरी शहराच्या सुधारित नळपाणी योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साळवी स्टॉप ते शीळमधील पाटीलवाडीपर्यंत जलवाहिनी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील जॅकवेलपर्यंतचे ५०० मीटरमधील जलवाहिनी उभारणीचे काम बाकी आहे.

जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन जलवाहिनीतून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शीळचे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार आहे.

Web Title: Tanker's 700 rounds in 15 days in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.