मान्सूनच्या आगमनामुळे खेडमधील टँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:05+5:302021-06-10T04:22:05+5:30
खेड : मार्च महिन्यापासून तालुक्यातील १९ गावे व ३७ वाड्यांना टँकरने सुरू असलेला पाणी पुरवठा मान्सूनच्या आगमनामुळे आटोक्यात आला ...
खेड : मार्च महिन्यापासून तालुक्यातील १९ गावे व ३७ वाड्यांना टँकरने सुरू असलेला पाणी पुरवठा मान्सूनच्या आगमनामुळे आटोक्यात आला असून, मंगळवारपासून टँकरने पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मान्सूनच्या येण्याने आता प्रशासनावरील हा ताण कमी झाला आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या १ तारखेला जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यात वरची धनगरवाडी येथे धावला होता. त्यानंतर मात्र उन्हाच्या वाढत्या काहिलीने उपलब्ध जलस्रोत आटत चालल्याने पाणीटंचाईचा दाह हळूहळू जाणवण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला एका गावातील १ वाडी अशी आकडेवारी असलेल्या तालुक्यातील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या वाढत जाऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १९ गावे व ३७ वाड्या अशी स्थिती झाली होती. ५ टँकरच्या मदतीने टंचाईग्रस्त भागाला एकदिवस आड पाणी पुरवठा करून तहान भागवली जात होती.
कोकण किनारपट्टीवर धडकलेले तौक्ते वादळ आणि त्यानंतर सलग ३ दिवस कोसळलेला पाऊस यामुळे काहीअंशी आटलेले जलस्रोत भरले होते. मात्र, त्यानंतर उन्हाची काहिली कायम राहिल्याने टंचाई कायम होती. मात्र, आता पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील आटलेले जलस्रोत पुन्हा भरले आहेत. त्यामुळे पंचायत समितीने टँकरचा पाणी पुरवठा बंद केला आहे.