कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी टास्क फोर्सकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:59+5:302021-05-21T04:32:59+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन व्हावे, या ...

The task force is responsible for the protection of children who have lost their parents to corona | कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी टास्क फोर्सकडे

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी टास्क फोर्सकडे

Next

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन व्हावे, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे बाधित व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. काही ठिकाणी दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेदेखील टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या टास्क फोर्सचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य आहेत. जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या पालकांच्या बालकांसाठी काळजी व संरक्षणाची सेवा तत्परतेने देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय (दूरध्वनी क्रमांक ०२३५२ - २२०४६१) अंतर्गत रत्नागिरीतील जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समृद्धी वीर यांच्याकडे तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

शिशुगृह, बालगृह निश्चित

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना तत्काळ आधार आणि सुरक्षितता मिळण्यासाठी ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी चिपळूण येथील भारतीय सेवा समाज केंद्राचे शिशुगृह निश्चित करण्यात आले आहे. तसेच ६ ते १८ वयोगटातील मुलींसाठी लांजा येथील बालगृह, तर या वयोगटातील मुलांसाठी रत्नागिरीतील शासकीय बालगृहाची निश्चिती करण्यात आली आहे.

चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांवर गुन्हा

समाज माध्यमांद्वारे दत्तक दिले जाईल किंवा घेतले जाईल, असे चुकीचे संदेश पाठवणे व त्यास प्रतिसाद देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. कोविड कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकाची अथवा कोरोना बाधित पालकांच्या बालकांना तात्पुरत्या स्वरूपात गरज लागत असल्याची माहिती कोणालाही मिळाल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईनवर तत्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा टास्क फोर्सने केले आहे.

Web Title: The task force is responsible for the protection of children who have lost their parents to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.