महाराष्ट्राच्या भाताची सात राज्यांना गोडी; हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:33 AM2023-04-10T06:33:03+5:302023-04-10T06:33:37+5:30
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांना लागली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने ‘रत्नागिरी आठ’ जातीचे बियाणे तयार करून अन्य राज्यांत त्याची विक्री करीत आहेत. रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्राने २०१९ मध्ये ‘रत्नागिरी आठ’ हे वाण विकसित केले.
कोकणात लोकप्रिय
सबंध कोकण व विदर्भात या वाणाने लोकप्रियता मिळविली. या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सहा राज्यांमध्ये पसंती मिळत आहे.
१३५ ते १४०
दिवसांत हे पीक तयार हाेते. कापणी वेळेवर केल्यास तांदूळ तुटीचे प्रमाण कमी येते. मध्यम उंची असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. करपा किंवा कडा करपा या रोगाला प्रतिकारक आहे. सरासरी उत्पन्न हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे होते.
डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या अकरा जाती व एक संकरित जात विकसित केली आहे. ‘रत्नागिरी १’ हे वाण जुने असून, देशाबराेबरच अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळविली आहे. आता ‘रत्नागिरी आठ’ या वाणाला परराज्यांतही पसंती मिळत आहे.
- डाॅ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी