चहाची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:33+5:302021-06-19T04:21:33+5:30
आम्ही मूळ विषयाकडे येत म्हणालो, कोरोनाच्या या लाॅकडाऊनमध्ये माणसांना खाण्याचे वांदे झाले आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना एका वेळी ...
आम्ही मूळ विषयाकडे येत म्हणालो, कोरोनाच्या या लाॅकडाऊनमध्ये माणसांना खाण्याचे वांदे झाले आहे. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना एका वेळी जेवण मिळेना झालंय. तिकडे बिचारा शेतकरी पिकवतो अन्न धान्य, पण विक्रीच बंद झाल्याने तो अडचणीत आला आहे. यावर काहीतरी ठोस उपाय काढणे गरजेचे आहे. तसे बंडोपंतांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, मी सांगतो जबऱ्या उपाय. आम्ही आश्चर्याने कान टवकारले. अशी एक गोळी बनवायची की, त्यामध्ये संपूर्ण दिवसभरात शरीराला लागणारी ऊर्जा असेल. गोळी हजार एमजीची असेल. मात्र, ती शरीरात प्रवेश करेल आणि जठरामध्ये पोहोचेल, तेव्हा एक पूर्ण जेवणात तिचे रूपांतर होईल. त्या गोळीत शरीराला लागणाऱ्या सर्व अन्नघटकांची रेलचेल असेल, अर्थात शाकाहारी आणि मांसाहारासाठी वेगवेगळी गोळी असणार. एक सकाळी, एक रात्री खाईल. लॉकडाऊन असो नाहीतर फॉकडाऊन असो, प्रत्येकाला महिन्याला साठ गोळ्या सरकारने दिल्या, तर तो बाहेर कशाला जाईल, आम्ही तर पार उडालो. घरात गॅस नको. स्वयंपाकासाठी खर्च नको. बाजारात जाऊन भाजी, किराणा आणण्याची गरज नाही. लोक बाजारात जाणार नाहीत, त्यामुळे गर्दी नाही. साहजिकच कोरोना फैलावणार नाही. त्यांची ही आयडिया ऐकून चाटच पडलो. खरंच ही आयडिया आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलून धरली, तर खूप समस्या सुटतील, पण इतकं सारं अन्नधान्य पिकवून शेतकऱ्यांना काय मिळणार, बंडोपंत हसून म्हणाले, तेच अन्नधान्य घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून सूक्ष्म कणांमध्ये त्याचे रूपांतर करून ती हजार एमजी गोळीच्या रूपात तयार केली जाणार आहे. त्यासाठी ॲटोमाइज कारखाने उभे केले जातील. आम्ही नकळत उद्गारलो, अरे वा, म्हणजे शेतकऱ्यांनी पिकविलेलं सर्व अन्नधान्य एकत्रित करून याची निर्मिती केली जाईल? वा बंडोपंत, मानलं राव तुम्हाला. नकळत स्वयंपाकघराच्या दिशेला पाहत म्हणालो, अहो ऐकलं का? तुमचा तो इम्युनिटीवाला चहा करा जरा. आतून आवाज आला, सारे ऐकले तुमचं. आता जेवणाच्या गोळीबरोबर चहाची गोळी तयार करायला सांगा बंडोपंताना. आणि तुम्ही आज आंघोळ न करता, आंघोळीची गोळी खावून वर्क फॉर्म होम करा. गोळ्यांची संख्या वाढतच जाईल, या भीतीने बंडोपंताना म्हणालो, आता तेवढं चहाच्या गोळीचे मनावर घ्या. त्यावर बंडोपंत दादा कोंडके स्टाईलने हसून म्हणाले, जगाचं जाऊ दे, पण तुमच्या घरासाठी तरी चहाची गोळी बनविण्याची आयडिया माझ्या मनात आली, पण आता ती सांगणार नाही. चलतो आम्ही. तुम्ही अंघोळीची गोळी खा नि कामाला लागा. खी... खी... खी... आमची तर पारच जिरली राव! - डॉ.गजानन पाटील