एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:50 PM2018-09-04T23:50:12+5:302018-09-04T23:50:37+5:30

प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूजावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढावी, तसेच अभ्यासातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून सांगण्यासाठी लांजा तालुक्यातील सरस्वती विद्यानिकेतन खावडीच्या अध्यापिका

A teacher has started the entire laboratory for the whole district - teacher day special | एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष

एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष

Next

मेहरून नाकाडे ।
रत्नागिरी : प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूजावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढावी, तसेच अभ्यासातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून सांगण्यासाठी लांजा तालुक्यातील सरस्वती विद्यानिकेतन खावडीच्या अध्यापिका दामिनी भिंगार्डे यांनी स्वखर्चाने फिरती प्रयोगशाळा तयार केली आहे. जिल्हाभरातील विविध शाळांमधून एकावेळेला २५ प्रयोग प्रत्यक्ष कृती करून सादर करतात. दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रयोग सादर करीत असून, गेली पाच वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे.

प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे भिंगार्डे यांनी स्वखर्चाने खरेदी केली. त्यांच्या या कृतीमुळे तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य दत्ता कदम यांनी या उपक्रमासाठी दहा हजाराची रक्कम पुढे केली आणि लोकसहभागातून ६५ हजार रूपयांचे साहित्य असलेली फिरती प्रयोगशाळा दामिनी भिंगार्डे यांनी तयार केली. मुंबई, पुण्याबरोबर लगतच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातही फिरती प्रयोगशाळा होती. मात्र रत्नागिरीत भिंगार्डे यांनी तयार केलेली पहिली प्रयोगशाळा आहे.

प्रयोगशाळेत ६० प्रकारची विविध उपकरणे आहेत. शिवाय इंग्रजी, मराठी भाषेतील लॅमिनेट केलेल्या प्रयोगाच्या माहितीच्या पट्ट्या आहेत. दोन तास विद्यार्थ्यांना गटागटाने प्रयोग उपकरणे स्वत: हाताने हाताळून प्रयोग करावयास देण्यात येतात.
संपूर्ण दिवसभर शाळेत ओळख विज्ञानाची प्रयोग राबविण्यात येतो. निम्म्या विद्यार्थ्यांना एलसीडीवर मंगलयान, चांद्रयान मोहीम, अभ्यासक्रमातील व रत्नागिरी जिल्ह्यातील जैवविविधता, स्वच्छता मोहीम, वैयक्तिक आरोग्याची काळजी याबाबत माहिती देण्यात येते. त्याचवेळी निम्म्या विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविले जातात. चार विद्यार्थ्यांचे गट तयार करून २५ प्रयोग विद्यार्थी करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग हाताळता येतो. या प्रयोगशील कृतीमुळे प्रयोग लक्षात राहण्याबरोबर वैज्ञानिक साहित्य हाताळण्याचा शिवाय स्वत: प्रयोग करण्याचा आनंदही लाभतो. श्री सरस्वती विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक डी. डी. देसाई यांनी दामिनी भिंगार्डे यांच्या प्रयोगशाळेला प्रोत्साहित केल्यामुळे ही प्रयोगशाळा तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळामध्ये सतत फिरत असते.

विज्ञान वाचन संस्कृती रूजावी, या उद्देशाने दामिनी भिंगार्डे या स्वयंप्रेरणेने ६ ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयावर हस्तलिखीत स्पर्धा आयोजित करीत आहेत. तालुका विज्ञान प्रदर्शनावेळी हस्तलिखीत प्रदर्शन मांडले जाते. उत्कृष्ट पाच केंद्राना बक्षिसे दिली जातात. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्याकडून लेख मागविले जातात. गेली चार वर्षे हा उपक्रम सुरू आहे. विज्ञान, पर्यावरण, अवकाश विषयावर स्पर्धा घेण्यात आली असून, यावर्षी पाणी हा विषय देण्यात आला आहे. भविष्यात हस्तलिखितांचे वाचनालय तयार करण्याचा मानस आहे.

शिक्षकांसाठी कार्यशाळा
शासनाकडून मूल्यमापनावर आधारित प्रशिक्षण नेहमी आयोजित केली जातात. मात्र, दामिनी भिंगार्डे स्वत: शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रम, संकल्पना, शंकानिरसन, कृतियुक्त शिक्षण, मूल्यमापन या विषयावर अभ्यास मंडळाचे तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते हेमंत लागवणकर यांचे व्याख्यानही त्या आयोजित करीत आहेत.

विज्ञान जिज्ञासा
प्रत्येक केंद्रातून १० मिळून २१ केंद्रातून २१० विद्यार्थ्यांसाठी निवडक प्रयोग दिग्दर्शन, विज्ञान विषयक व्याख्यान, मुक्त प्रश्नोत्तरे कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यातून १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रातून तज्ज्ञ बोलाविण्यात येतात. विद्यार्थ्याकडून विज्ञान प्रतिकृती तयार करण्यात येतात. दरवर्षी तीन निवडक प्रतिकृतींना त्या स्वत: बक्षिसे देतात.

 

दिवसभराच्या कार्यक्रमातून इयत्ता सहावी, ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले सर्व प्रयोग दाखविले जातात. प्रत्येक प्रयोगावेळी विद्यार्थ्यांच्या हातातून फुटणारे साहित्य विकत आणले जाते. साहित्यात तूटफूटही होणारच मात्र स्व: हाताने करण्यात येणाऱ्या प्रयोगाचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत असल्याने फिरत्या प्रयोगशाळेचा हेतू सफल होत आहे. याशिवाय हस्तलिखित प्रदर्शन, विज्ञान जिज्ञासा, शिक्षकांसाठी कार्यशाळा, अवकाश वाचन कार्यशाळा यासारखे उपक्रम स्वखर्चाने राबवित आहे.
- दामिनी भिंगार्डे, विज्ञान शिक्षिका

Web Title: A teacher has started the entire laboratory for the whole district - teacher day special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.