शिक्षक होणार विस्तार अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:32 AM2021-08-15T04:32:51+5:302021-08-15T04:32:51+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पदाेन्नतीने २६ विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ९८ शिक्षक, मुख्याध्यापक ...
रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पदाेन्नतीने २६ विस्तार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ९८ शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांची यादी तयार करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारीच हाकत आहेत. तरीही आपला जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या इतर जिल्ह्यांपेक्षा पुढे आहे हे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंतची रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी अनेकदा मागणी करुनही शासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नुकत्याच जिल्ह्यातील ३ विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या. मात्र, शिक्षक बदल्यांना मुहूर्त मिळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण चालू शैक्षणिक वर्षात करण्यात येणाऱ्या शिक्षक बदल्याही शासनाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अगदी खेड्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी विस्तार अधिकाऱ्यांची पदे पदाेन्नती समायोजनाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची एकत्रित सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पदोन्नती नाकारलेेल्यांना या समायोजनाच्यावेळी वगळण्यात येणार आहे.