दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 04:45 PM2020-02-10T16:45:25+5:302020-02-10T16:46:43+5:30
शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.
बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमातून इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धा, कार्यानुभवांतर्गत टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती, अभिवाचन कार्यक्रम, बागबगीचा संगोपन, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे, विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील शाळेत केला जातो.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली असून, त्याचा वापर पोषण आहारासाठी केला जात आहे. वनभोजन, शैक्षणिक सहलीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.
शाळेचे शिक्षक राजेश गोसावी यांनी लेखन, दिग्दर्शन केलेली एकांकिका ह्यसंस्कारह्ण विद्यार्थ्यांनी कणकवली येथे बॅ. नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सादर करून यश संपादन केले. शालेय विद्यार्थिनी सिध्दी गोताड हिला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले आहे. याशिवाय दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी झालेल्या कला आरोग्य बालनाट्य महोत्सवातही एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
बाल संस्कार नाट्य अकादमी, पुणे आयोजित बालनाट्य स्पर्धेत अमन गोताड याने प्रथम श्रेणी मिळवली. याशिवाय नेहरू युवा संस्कार केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व, चित्रकला, बुध्दिमत्ता, निबंध तसेच समूहगीत स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. प्रत्येक विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांचा भर आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धा असो वा एकांकिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी प्राप्त होत आहे.
- अॅड. अवधूत कळंबटे, पालक
एक विद्यार्थी केंद्रित न करता, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, यासाठी शाळेचे शिक्षक परिश्रम घेत आहेत. शालेय तसेच शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जात आहे, विद्यार्थीही यश मिळवित आहेत.
- डॉ. अस्मिता मजगावकर, केंद्रप्रमुख