‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ मागणीसाठी रत्नागिरीतील शिक्षकही संपात सहभागी
By मेहरून नाकाडे | Published: March 14, 2023 04:08 PM2023-03-14T16:08:53+5:302023-03-14T16:09:35+5:30
जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत
रत्नागिरी : ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’ या मागणीसाठी मंगळवारी राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी संपात सहभागी झाले होते. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनात सहभागी न होता कृतीशील पाठिंबा दिला.
संपात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकही सहभागी झाले होते. अध्यापन करण्यासाठी शिक्षकच शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर सुट्टीची सूचना लावण्यात आली होती. खासगी शाळांचे अध्यापन सुरू असले तरी शासकीय मान्यताप्राप्त शाळांमध्ये अध्यापन व अन्य कार्यालयीन कामकाज बंद होते.
जिल्ह्यात १२ हजार प्राथमिक, सहा हजार माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन दोन हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांवर भरती या मागणीसाठी सर्व शिक्षकही संपात सहभागी झाले होते.