शिक्षकांप्रमाणे पालक-समाजही तेवढाच जबाबदार
By Admin | Published: July 12, 2014 12:37 AM2014-07-12T00:37:16+5:302014-07-12T00:37:46+5:30
गुरूपौर्णिमा विशेष : शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं बदलतंय...
रत्नागिरी : गुरू-शिष्याच्या नात्याला आज शिक्षक - विद्यार्थी अशाच नात्याचं स्वरूप आलं आहे. गुरू-शिष्य या शब्दांनाच खूप अर्थ आहेत. आताच्या काळात तसे गुरू आणि तसे शिष्य अपवादानेच सापडतात. काळाच्या ओघात या नात्यात खूप बदल झाले आहेत. पण, जे शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेऊन वागतात, त्यांच्याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव दिसतो, तो कृतीतून व्यक्त होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांशी असलेले शिक्षकाचे नाते गुरू-शिष्याचे नाते ठरावे, यासाठी शिक्षक, पालक आणि समाज या साऱ्यांचीच जबाबदारी महत्त्वाची ठरते.
उद्या शनिवारी गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’च्या रत्नागिरी कार्यालयात परिचर्चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरू-शिष्यांमधील नातं बदलतंय का? या मुख्य विषयावर ही चर्चा झाली. या चर्चेत श्रीमान गंगाधरभाऊ गोविंद पटवर्धन स्कूलचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, फाटक प्रशालेच्या दाक्षायिणी बोपर्डीकर, शिर्के प्रशालेच्या गुरूकुल प्रकल्पाचे प्रमुख राजेश आयरे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद आंबेकर यांनी या विषयावर विविध मते मांडली.
चर्चेची सुरूवात ‘गुरू-शिष्य’ याच शब्दावरुन झाली. आज गुरू-शिष्य म्हणण्यासारखी पिढी दिसत नाही. आज अवती-भोवती दिसतात ते शिक्षक आणि विद्यार्थी. हे नातं अधिक व्यवहारी झालं आहे, असं मत प्रतापसिंह चव्हाण यांनी मांडले. शिक्षण प्रक्रिया, पुस्तकं आणि अभ्यासक्रमांचे बदलते स्वरूप यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी नात्यावर होतोय, असं मत दाक्षायिणी बोपर्डीकर यांनी मांडलं. हे नातं सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थांनी बदलतंय, असंही मत त्यांनी मांडलं. जे शिक्षक आज विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना दिशा दाखवतात, त्या शिक्षकांबद्दल आजही विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव दिसतो, असे मत प्रा. आनंद आंबेकर यांनी प्रकर्षाने मांडले. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचा विचार करताना समाजरचनेचा प्राधान्याने विचार करायला हवा. कारण समाजरचनेचा या नात्यावर खूप परिणाम होतोय, असे मत राजेश आयरे यांनी मांडले.
विद्यार्थ्यांच्या मनातला त्यांच्या शिक्षकांबद्दलचा आदर कायम राहील किंवा वाढेल, असं वर्तन पालकांकडून घडायला हवं, असा मुद्दाही या चर्चेतून पुढे आला. शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं अधिक सुदृढ होण्यासाठी मुळात शिक्षकांनी मित्र आणि पालक (ा१्रील्ल िंल्ल िॅ४ं१्िरंल्ल) अशा दोन्ही भूमिकांमधून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधायला हवा. त्याला पालक आणि समाजाकडून तशीच जोड मिळायला हवी, असा निष्कर्ष या चर्चेतून पुढे आला. (प्रतिनिधी)