शिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीचे काम, शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:29 PM2019-03-28T12:29:32+5:302019-03-28T12:33:49+5:30
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीचे ठरणार असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे़.
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीचे ठरणार असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे़.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत़ त्यानंतर आता प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या परीक्षांमध्ये गुंतले आहेत़.
हा परीक्षांचा कालावधी सुरु झालेला असतानाच लोकसभा निवडणूक मतदान जनजागृतीचे काम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माथी मारण्यात आल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे़ निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय काम असले तरी ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी व शिक्षकांना ते दिल्याने त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे़.
मतदान जनजागृतीचे काम बुधवारपासून सुरु करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिले आहेत़ त्यामध्ये बुधवारी पहिल्या दिवशी मतदान जागृतीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून विविध घोषवाक्य लिहून घेणे व प्रभातफेरीवेळी त्यांचा वापर करणे, रांगोळी स्पर्धा, अंगणवाडी सेविकेच्या मदतीने पालक जागृती सभा व हळदी-कुंकू, प्रत्येक शनिवारी प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, काव्यस्पर्धा, भित्तीचित्र तयार करणे व दर्शनी भागात लावणे, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षण विभागातील अधिकारी यांची क्षेत्रभेट, प्रश्नमंजुषा, सायकल रॅली, मतदान जागृती दौड, पथनाट्य सादरीकरण, मतदान यंत्राची ओळख व मुलांच्या बोटाला शाई लावणे, गीतमंच, संकल्पपत्रांचे संकलन करणे, शिक्षकांचे मार्गदर्शन व मतदारांची मुलाखत, चालता-बोलता, व्हीव्हीपॅट क्लीप आदी कार्यक्रम दररोज २० एप्रिलपर्यंत राबवायचे आहेत़
हा कार्यक्रम दैनंदिन शालेय कामकाज सांभाळून राबवायचा आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शिक्षकांनी दक्षता घ्यावयाची आहे़.
दरम्यान, दिलेल्या नियोजनाप्रमाणे त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ त्याचबरोबर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचा रोजचा अहवाल व दैनंदिन उपक्रमांचे पाच फोटो सादर करावयाचे आहेत़ त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षक निवडणुकीच्या कामात अडकणार असल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.