सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, भात पिकेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:20 AM2021-07-05T04:20:30+5:302021-07-05T04:20:30+5:30

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताैक्ते वादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. मान्सूनपूर्व पाऊसही चांगला झाला. त्यामुळे गतवर्षीच्या ...

Tell me, Bholanath, will it rain, will the rice ripen? | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, भात पिकेल काय?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, भात पिकेल काय?

Next

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताैक्ते वादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. मान्सूनपूर्व पाऊसही चांगला झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १३४०.४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असला तरी ऐन भात लागवडीवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने लागवडीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या केल्याने भाताच्या रोपांची चांगली वाढ झाली. त्यामुळे २१ ते २२ दिवसानंतर शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात शेतकरी भात लागवड करत आहेत. मात्र, कडक ऊन्हामुळे लागवड केलेल्या जमिनीला तडे गेले आहेत. रोपे पिवळसर पडली आहेत. लागवड केलेली रोपे वाळू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्याठिकाणी पाटाचे पाणी उपलब्ध आहे किंवा मळेशेतीतील भात खाचरातून पाणी आहे, तेथे लागवड केली जात असली, तरी निव्वळ लागवड केल्याचे समाधान मिळत आहे. लागवडीवेळी खते वापरली जात असल्याने सूर्याची उष्णता व खताची उष्णता यामुळे रोपे करपण्याचा धोका आहे. दिवसभरात एखादी सर कोसळते अन्यथा नाही अशीच स्थिती आहे. पावसावरच बहुतांश शेती अवलंबून असल्याने अद्याप ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होणे बाकी आहे. पावसाअभावी लागवडीला उशीर होणार आहे, तर पाण्याअभावी लागवड केलेली भातशेती धोक्यात आली आहे.

भाताची दुबार पेरणी

अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर भाताची पेरणी केली होती. संततधार पावसामुळे काही ठिकाणी भाताची रोपेच रूजली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरलेले भात उगवले असले तरी लागवडीसाठी अद्याप अवधी आहे.

तालुका पाऊस पेरणी

(मिमी) (हेक्टरमध्ये)

मंडणगड ४८६.५७ ४८३.५०

दापोली ६६१.७१ ७२७.४१

खेड ५६२.७२ ९१५.५०

गुहागर ८७१.५५ ६९३.९१

चिपळूण ७१४.६१ ९९०.२७

संगमेश्वर ९१०.१२ ११४७.६८

रत्नागिरी ९६५.१३ ७१८.७०

लांजा ८९४.७२ ७००.००

राजापूर १००५.७८ ७१२.७५

लागवडीची कामे खोळंबली

जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, आतापर्यंत १० हजार ५०० मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणथळ भागात पेरणी केलेले भात न रूजल्यामुळे काही शेतकऱ्यांनी जागरुकता दाखवत अन्यत्र दुबार पेरणी केली होती. त्यामुळे दुबार पेरलेली रोपे चांगली उगवली असून, शेतकऱ्यांपुढील संकट टळले आहे. मात्र, लागवडीची कामे सुरू असताना, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत.

मान्सूनपूर्व पावसामुळे रोहिणी नक्षत्रातच पेरणी उरकण्यात आली होती. रोपे काढून अन्यत्र लागवड करण्यात येते, पावसावरच शेतीची कामे अवलंबून असल्याने लागवडीची कामे थांबली आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रातील लागवड करण्यात येत असली, तरी प्रखर उष्णतेमुळे पाणी टिकत नाही. त्यामुळे रोपे कोमेजली आहेत.

- मारूती चाळके, शेतकरी

खरीप हंगामातील शेतीसाठी बियाणे व खतांची उपलब्धता वेळेवर करून देण्यात आली होती. पेरण्यांची कामे वेळेवर पूर्ण होऊन लागवडीची कामेही नियोजित वेळेपूर्वी सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे लागवडीच्या कामांना विलंब होत आहे. लागवड केलेल्या भात खाचराला शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पाणी देणे गरजेचे आहे.

- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

पावसावरच शेती अवलंबून आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली असून, लागवड केलेल्या क्षेत्राला पाणी देणे शक्य होत आहे. मात्र, पाण्याची उपलब्धताच नसलेल्या क्षेत्रावर लागवडीचा प्रश्न निर्माण झाला असून, दरवर्षी भात लागवडीवेळी निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- राजेश पागदे, शेतकरी

Web Title: Tell me, Bholanath, will it rain, will the rice ripen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.