टेम्पोनं दिली दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू; गावकरी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 09:21 PM2022-03-31T21:21:04+5:302022-03-31T21:21:16+5:30
उन्हाळे कुंभारवाडी येथे आयशर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात, महामार्ग ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईचा फटका
राजापूर - मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी धबधब्यानजीक गोव्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक देत चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. बाजीराव डोंगळे . ५२ रा.हातिवले व विजय हरेश्वर शिंदे .४५, रा.खडपेवाडी, राजापूर अशी या अपघातात मृत्युमृखी पडलेल्या दोन तरूणांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या दोन तरूणांच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी संथ गतीने सुरू असलेले काम आणि होणारी दिरंगाई व संबधित यंत्रणेची डोळेझाक यामुळे गेले वर्षभर या ठिकाणी वारंवार अपघात होऊन दुर्घटना घडत असून ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळेच या दोघांचा हकनाम बळी गेल्याच्या संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. गेले काही दिवस वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र संबधित यंत्रणेकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अशा अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
या अपघातानंतर अपघातस्थळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उपस्थित ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या नावाने शिमगा करत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए.बी.०२७७ वरून हातिवले येथून राजापूरला येत होते. हे दुचाकीस्वार हे कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता दुचाकीच्या पुढे असलेल्या कंटेनरची साईट घेऊन पुढे येण्याच्या प्रयत्न करत असताना मागून गोवा दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली जाऊन सुमारे १०० ते १२० फुट फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही टेम्पोच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.
दुचाकीला धडक दिल्यानंतर या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही या टेम्पोने धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र यात एसटीचे नुकसान झाले आहे. सदरचा आयशर टेम्पो सिंधुदुगार्तून खेड येथे जात होता. या अपघाताला कारणीभुत असलेल्या टेम्पो चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसांनी तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांसह पोलीस कर्मचारी तसेच या परिसरातील अनेक स्थानिक ग्रामस्थ, वाहक चालकांनीही अपघातस्थळी धाव घेतली. तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, नगरसेवक सौरभ खडपे आदींसह अनेकांनी या अपघातील या दोन मृत तरूणांना बाहेर काढुन खासगी रूग्णवाहीकेने या दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही पोलीसांकडून सुरू होती. या अपघातात ठार झालेला विजय उर्फ बंडया शिंदे हा होतकरू तरूण होता. तो हातिवले येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. कामावरून घरी परतत असताना काळाने हा घाला घातला व त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.