‘त्या’ धोकादायक पुलाची तात्पुरती डागडुजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:56+5:302021-09-21T04:34:56+5:30
अडरे : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयानजीकचा गणेशखिंड ते दुर्गेवाडी मार्गावरील पूल मोडकळीस आला आहे. आमदार शेखर निकम ...
अडरे : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयानजीकचा गणेशखिंड ते दुर्गेवाडी मार्गावरील पूल मोडकळीस आला आहे. आमदार शेखर निकम यांनी धोकादायक झालेल्या या पुलाची पाहणी केली आणि तातडीने डागडुजी करण्याची सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार तत्काळ काम सुरू झाले. आमदार निकम यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश काणसे, सावर्डेचे उपसरपंच जमीर मुल्लाजी, बांधकाम विभागाचे अधिकारी राणदिवे, उमेश पवार आदी उपस्थित होते.
हॉटेल समर्थ सावलीशेजारी हा पूल आहे. त्या पुलाचे पिलर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे पूल खचला असल्याने तो वाहतुकीस धोकादायक झाला आहे. सावर्डे ग्रामपंचायतीने याची तत्काळ दखल घेत या पुलावरून वाहतूक न करण्याचे आवाहन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता आता बंद केला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक वालावलकर हॉस्पिटलकडे जाणारा पर्यायी मार्ग कुडपरोड ते हॉस्पिटल किंवा कासारवाडीतून सुरू आहे. आमदार शेखर निकम यांनी नुकतीच या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार तातडीने डागडुजीचे काम सुरू झाले आहे.