रत्नागिरी जिल्ह्यातील ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:47 PM2021-01-15T13:47:46+5:302021-01-15T13:49:23+5:30
Uday samant Ratnagiri-रत्नागिरी जिल्हा ॲग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत व नगरपरिषद वगळून नवीन बांधकामाला निर्बंध घालण्यात आल्याने १,४०१ गावांचा विकास खुंटणार होता. रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे बिल्डर आणि लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी : जिल्हा ॲग्रिकल्चर झोनमध्ये आल्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत व नगरपरिषद वगळून नवीन बांधकामाला निर्बंध घालण्यात आल्याने १,४०१ गावांचा विकास खुंटणार होता. रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे बिल्डर आणि लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ॲग्रिकल्चर झोनची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील ४ नगर परिषदा आणि ५ नगर पंचायती वगळून ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ग्रामीण भागात घरे आणि इतर इमारती बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा संपूर्ण विकास खुंटणार होता. याला बहुतांश जिल्हावासीयांचा विरोध होता. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाली होती.
त्यानुसार जोपर्यंत रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत ॲग्रिकल्चर झोनची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने रिझनल प्लॅन होत नाही, तोपर्यंत या झोनला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली. लवकरच रिझनल प्लॅन पूर्ण होऊन त्यामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होतील. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच तो प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
आरेवारे येथील जागा प्राणी संग्रहालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. दोन महिन्यांत याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.