रत्नागिरीत तात्पुरत्या शिक्षकांची नोकरी ठरली औटघटकेची, आठ दिवसातच केले कामावरून कमी
By मेहरून नाकाडे | Published: July 12, 2023 06:47 PM2023-07-12T18:47:41+5:302023-07-12T18:48:06+5:30
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता
रत्नागिरी : शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांमुळे जिल्हा परिषदेच्याशाळांतील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार ६८४ शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र आठ दिवसातच काहींना कामावरून कमी करण्यात आल्याने या शिक्षकांतून संताप व्यक्त होत आहे. सहाव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या असून, यामुळे तात्पुरत्या शिक्षकांना घरी बसावे लागले आहे.
जिल्हा परिषदशाळांचे शिक्षक जिल्हा बदलीने आपापल्या जिल्ह्यात गेले. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायचे कोणी, हा प्रश्न निर्माण झाला होता. शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह पालक, लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा इशारा देण्यात आला.
पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तात्काळ आदेश देत ६८४ स्थानिक डीएड, बीएड धारक व पदवीधरांना नियुक्त्या देण्यात आल्या. शाळा व्यवस्थापन समित्यांतर्फे नियुक्त्या झालेले शिक्षक शाळेत रुजू ही झाले. मात्र आठ दिवस होईपर्यंतच त्यांना कामावरून कमी करण्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जारी केले आहे.
सहाव्या टप्प्यातील कायम शिक्षकांना बदल्या देऊन त्यांना सोयीच्या शाळा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हंगामी स्थानिक पुन्हा बेरोजगार झाले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळेत रुजू झालेल्या या तात्पुरत्या शिक्षकांना शाळेत कार्यरत ठेवावे अशी मागणी केली जात आहे.