कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन होता दहा आरोपींचा..!
By admin | Published: July 15, 2014 12:06 AM2014-07-15T00:06:21+5:302014-07-15T00:06:21+5:30
पोलिसांमुळे तपासाला मिळाले यश
दापोली : रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून पळालेल्या रितेश काशिनाथ कदम या दुसऱ्या आरोपीलाही दापोली पोलिसांनी गजाआड केले आहे. कारागृहातून पळून जाण्यासाठी १० कैद्यांनी एक प्लॅन केला होता. पण, प्रत्यक्षात दोनच कैदी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची कबुली रितेश याने पोलीस तपासात दिली आहे.
किरण मोरे या एका कैद्याला काही दिवसांपूर्वीच पनवेल येथे तो पत्नीला भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी झडप घालून पकडले होते. त्याचवेळी रितेश कदम हा पोलिसांना गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पनवेल येथून रितेश मुंबईतील आपल्या बहिणीकडे गेला. तिच्याकडून त्याने ५०० रुपये घेतले. ज्यावेळी तिला तो कारागृहातून पळून आल्याची माहिती मिळाली, त्यावेळी तिने त्याला हाकलून दिले. त्यानंतर कदम हा लपतलपत आपल्या गावी केळकर आंबवली, पोस्ट केळशी येथे पोहोचला.
पोलिसांना चकवा देणारा रितेश हा गावी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचला. कधी घरात, तर कधी रानात तो आपले वास्तव्य करीत होता. १३ जुलै रोजी तो आपल्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव, नवनाथ जगताप, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश जाधव, विष्णू गिम्हवणेकर, उदय भोसले, शिवराज दिवाळे, राजू मोहिते, मंगेश शिगवण, संदेश गुजर, अनुप पाटील व आंब्रे यांच्या पथकाने त्याच्या घराभोवती सापळा रचून त्याला अटक केली.
मध्यरात्री २.३० वाजता अटक केल्यानंतर त्याला दापोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीअंती रितेश कदम व किरण मोरे याच्यासह अन्य आठजणांनी कारागृहातून पळून जाण्याचा प्लॅन केल्याचे पुढे आले आहे. मात्र, ठरलेल्या प्लॅनप्रमाणे केवळ दोघेजणच कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाले.
या दोघांनीही परस्परांची साथ करतच रत्नागिरीतून पोबारा केला. पनवेलपर्यंत हे दोघेही परस्परांच्या साथीनेच होते. त्यानंतर किरण हा पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर रितेशचा एकट्याचा प्रवास सुरू झाला.
पळून जाण्यासाठी दरवाजाची बनावट किल्ली या आरोपींच्या हाती घटनेपूर्वी दोन दिवस अगोदरच लागली होती. त्यानंतर त्यांनी सुरक्षा यंत्रणेचा कानोसा घेत प्लॅन रचला. त्यांच्या सुदैवाने तो पूर्णही झाला. मात्र, दापोली पोलिसांच्या दक्षतेमुळे पुन्हा हे दोघेही आरोपी गजाआड गेले आहेत. (प्रतिनिधी)