रत्नागिरीत थैमान : तुरुंगातील दहाजणांना कोरोना, डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:33 PM2020-07-02T16:33:22+5:302020-07-02T16:56:25+5:30
पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच होत आहे. आजवर मुंबईतून आलेले नागरिक कोरोनाबाधित सापडत होते. मात्र, आता स्थानिक नागरिकही आढळू लागले असून, गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालांमध्ये आणखी ४७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर तुरुंगातील दहाजणांसह एका डॉक्टरालाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची साखळी दिवसेंदिवस वाढत असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६६१च्या घरात पोहोचला आहे. जिल्हा रुग्णालयातून गुरूवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जेल रोड क्वॉटर्समध्ये १०, पोलीस अधीक्षक कार्यालयात १, परकार हॉस्पीटलमध्ये १, रत्नागिरी शहरातील ३, राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे १, दापोली तालुक्यातील हर्णै येथे १२, खेड तालुक्यातील खोपी येथे १, वेरळ येथे १, लोटे येथे २, आष्टी येथे २, घरडा कॉलनीत २, खेड शहरात २, चिपळूण तालुक्यातील खेर्डीत २, कापरेवाडीत १, चिपळूण शहरात २, संगमेश्वर तालुक्यात २ आणि मंडणगड तालुक्यात १ रुग्ण आढळला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक रुग्ण आढळल्यानंतर या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
अनेकांनी सुट्ट्या टाकून घरी जाणे पसंद केले. तर रत्नागिरीतील जिल्हा कारागृहात एकाचवेळी १० जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृहातील दहा जणांमध्ये ८ कैदी तर दोन जेल पोलिसांचा समावेश आहे.