चिपळुणातील शाळा दुरुस्तीसाठी दहा लाखांचा प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:59+5:302021-06-10T04:21:59+5:30
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळाने घर, गोठ्यांबरोबरच चिपळूण तालुक्यातील २२ जिल्हा परिषद शाळांनाही जोरदार झटका दिला. छप्पर, भिंती, दरवाजे, खिडक्यांची ...
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळाने घर, गोठ्यांबरोबरच चिपळूण तालुक्यातील २२ जिल्हा परिषद शाळांनाही जोरदार झटका दिला. छप्पर, भिंती, दरवाजे, खिडक्यांची पडझड होऊन सुमारे सव्वादहा लाखांचे नुकसान झाले. ऐन पावसाळ्यातच चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने या शाळांची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डी.डी. इरनाक यांनी दिली.
तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यात मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्हा परिषद शाळांनाही बसला. यामध्ये चिवेली उर्दू शाळेचे २ लाख ५० हजार रुपये, कोकरे नं. ३ शाळेचे १ लाख रुपये, दहिवली बुद्रुक ओझरवाडी नं. १ शाळेचे ५ हजार रुपये, ताम्हणमळा नं. १ शाळेचे २० हजार रुपये, कोंढे नं. १ शाळेचे १० हजार रुपये, शिरळ नं. १ शाळेचे ३५ हजार रुपये, शिरळ उर्दू शाळेचे १ लाख २० हजार रुपये, मुंढे पायरवाडी शाळेचे १० हजार रुपये, मुंढे खोतवाडी शाळेचे १० हजार रुपये, वहाळ शाळेचे ३० हजार रुपये, कळकवणे रिंगी शाळेचे ५० हजार रुपये, कादवड रामवाडीशाळेचे ३ हजार रुपये, तिवडी गावठाण शाळेचे ५० हजार रुपये, मोरवणे नं.१ शाळेचे ५० हजार रुपये, वीर नं. २ शाळेचे ५० हजार रुपये, वीर नं. ५ शाळेचे ७५ हजार रुपये, सावर्डे कासार शाळेचे १० हजार रुपये, कोळकेवाडी धनगरवाडी शाळेचे ३० हजार रुपये, आबीटगाव शाळेचे ७५ हजार रुपये, पेढांबे दाभाडी शाळेचे ८ हजार रुपये, कान्हे मराठी शाळेचे २ हजार रुपये, शिरगाव शाळेने ३० हल्ला रुपये असे एकूण १० लाख २३ हजार रुपये नुकसान झाले आहे.