दहा महिने लोटले तरीही अद्याप राजापुरात गंगामाई प्रवाहीत, मात्र भाविकांनी गंगामाईकडे फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:06 PM2022-02-21T17:06:12+5:302022-02-21T17:06:39+5:30
गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते.
राजापूर : गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते. त्यानंतर दहा महिने लोटले तरीही अद्याप प्रवाहीत आहे. मात्र भाविकांनी गंगामाईकडे पाठ फिरविल्याचे सध्याचे चित्र आहे.
गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काशिकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्रोत सुरू आहे. मात्र काही कुंडातील पाण्यावर शेवाळी आलेली दिसून येत आहे.
सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते. जवळपास तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा पघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. हे सन २०१३ पासून चालू झाले आहे. काही वर्षे तर सलग आली होती. तर, काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खुपच लांबला होता.
यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले होते. अद्यापही गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरली आहेत. मात्र मुळ गंगा, गायमुख व गायमुखा जवळील कुंड वगळता सर्व कुंडाच्या पाण्यावर शेवाळी पसरली आहे. सर्वात मोठे असणारे काशिपुंड पूर्ण भरलेले असून गोमुखातून पाणी वाहत आहे. मुळ गंगेचा प्रवाहही अद्याप चांगल्या स्वरूपात वाहत आहे.
गतवर्षी ३० एपिल २०२१ ला गंगामाईचे आगमन झाले. गंगामाईचे आगमन झाल्यापासून १० महिने झाले तरी येथील सर्वच कुंडातील पाणी अद्यापही प्रवाहीत आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे यापुर्वी स्थानिक प्रशासनाकडुन गंगाक्षेत्रावर भाविकांना जाण्यास मनाई आदेश बजावण्यात आला होता. त्यामुळे गंगा आगमनानंतर या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, दुकानांची रेलचेल आणि त्याद्वारे होणारी लाखोंची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.
सद्यस्थितीत मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भिमाकुंडामध्ये पाणी असून काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहत आहे. तर मुळ गंगाही अद्याप प्रवाहीत आहे.
कोरोनाच्या संसर्गानंतर गंगाक्षेत्राला देखील चांगलाच फटका बसला आहे. गंगेच्या आजवरच्या इतिहासात एवढा परीणाम झाला नव्हता. गंगेच्या आगमन व अंतर्धान पावण्याच्या क्रियेत बदल झाल्यामुळे या स्थानावरील अर्थव्यवस्थेवर प्रथम परिणाम झाला होताच. मात्र कोरोना काळात तर येथील अर्थव्यवस्था थांबल्याचे चित्र आहे.