दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:47 PM2019-01-03T14:47:35+5:302019-01-03T14:48:57+5:30

परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना वर्तमानातील चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

Tenth Examination: The time of writing the paper by rewriting is now out of date | दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य

दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य

Next
ठळक मुद्देदहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गरज

रत्नागिरी : परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल्पना वर्तमानातील चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाकडे लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

चालू शैक्षणिक वर्ष (२०१८-१९) मध्ये दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, परीक्षा पध्दतीमध्येही बदल करण्यात आला आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेबरोबर विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल अशा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांऐवजी आता कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, बालभारतीने तशा पध्दतीने कृतिपत्रिका व व्हिडिओ तयार करून महामंडळाच्या संकेतस्थळावर लोड केले आहेत.

पहिल्या टप्प्यात सर्व विषयांच्या एकूण ७६ लाख ८६ हजार ३ प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यात आल्या होत्या. सराव प्रश्नसंच प्रसिध्द झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तर पत्रिकादेखील बालभारतीच्या संकेतस्थाळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातीलही कृतिपत्रिका डाऊनलोड करण्यास प्रारंभ झाला आहे. विद्यार्थीवर्ग सध्या या कृतिपत्रिकेव्दारे सराव करीत आहेत.

दहावीच्या विज्ञान विषयाचा अभ्यास विस्तारीत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक भर द्यावा लागणार आहे. दैनंदिन व्यवहारातील काही उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न तयार केले आहेत. भाषेच्या कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना सहज सोडविणे शक्य आहे. तोंडी परीक्षेचे भाषेतील वीस गुण कमी झाले असले तरी नवीन बदलानुसार अभिव्यक्ती, भावार्थ, व्याकरण असे ७० गुण विद्यार्थ्यांना मिळविणे शक्य आहे. परंतु त्यासाठी विचारक्षमतेचा कस लावावा लागणार आहे.

कृतिपत्रिका सोडविण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना तीन तास अपुरे पडत आहेत. बातमी लेखन, उतारे, सारांश लेखन, निबंध, कथालेखन, कवितांचे रसविचार लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना अवधी लागत आहे. दहावीच्या प्रत्येक पुस्तकातील धड्यांच्या खाली क्युआर कोड दिला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या विषयाबाबतची अधिकची माहिती उपलब्ध होत आहे.

प्रश्नोत्तरामध्ये लघु, दीर्घ उत्तरे यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. भाषेत उतारे वाचून प्रश्नांची उत्तरे लिहावी लागणार आहेत. विज्ञान विषयात कृतिपत्रिकेचे निरीक्षण करून उत्तरे लिहावी लागणार आहेत. इतिहासामध्ये युरोपातील विचारवंत, ऐतिहासिक वास्तूबाबत संकल्पचित्र पूर्ण करणे, नागरिकशास्त्रात निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याचा तक्ता, तर भूगोल विषयात भारत व ब्राझीलच्या पर्जन्यकाळामधील फरक विचारणारे प्रश्न आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे प्रत्येक विषयासाठी २० गुण होते. मात्र, विज्ञान विषय सोडून सर्व विषयांच्या तोंडी परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत.

पाठ्यपुस्तक मंडळाने एक संपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ बालभारतीच्या संकेतस्थळावर व युट्युबवर डाऊनलोड केला होता. विविध विषयांतील तज्ज्ञांचे व्हिडिओ असून, त्याव्दारे त्या-त्या विषयासंबंधी विद्यार्थ्यांना ज्ञार्नार्जन होत आहे. क्लिष्ट वाटणारे प्रश्न व त्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होत आहे.
 

पहिल्या टप्प्यात सर्व विषयांचे सराव प्रश्नसंच प्रसिध्द झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तर पत्रिकादेखील बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील सराव प्रश्नसंच डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्याव्दारे सध्या विद्यार्थ्यांनी सरावाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या प्रश्नसंच सोडविण्यासाठी नियोजित वेळ अपुरा ठरत असला तरी सरावाने विद्यार्थी पेपर वेळेत पूर्ण करतील.
- के. बी. रूग्गे, मुख्याध्यापक,
न्यू इंग्लिश स्कूल, नेवरे.

Web Title: Tenth Examination: The time of writing the paper by rewriting is now out of date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.