दहावी, बारावी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:30 AM2021-03-21T04:30:04+5:302021-03-21T04:30:04+5:30
रत्नागिरी : नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावी परीक्षा होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांबाबतच्या मार्गदर्शन सूचना मंडळातर्फे येत्या दोन दिवसात जाहीर ...
रत्नागिरी : नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावी परीक्षा होणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांबाबतच्या मार्गदर्शन सूचना मंडळातर्फे येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. मात विद्यार्थी, पालकांनी परीक्षेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेे करण्यात आले आहे.
महराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा सुरक्षित, सुरळीत तसेच नियोजित कालावधीत घेण्यात येणार असून, विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परीक्षेबाबत कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. यासंदर्भात मंडळामार्फत संकेतस्थळावर आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे निवेदने प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात देणार असून त्याच सूचना अधिकृत मानण्यात याव्यात, असेही सूचित केले आहे.
दहावीच्या लेखी परीक्षा दि.२९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत तर बारावीच्या परीक्षा दि.२३ एप्रिल ते दि. २१ मे या कालावधीत होणार आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा दि.१२ ते २८ एप्रिल आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दि.५ ते २२ एप्रिल या नियोजित कालावधीत होणार आहेत.